मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल एक्झिट पुढील सहा महिन्यांसाठी बंद, आता वाहतुकीसाठी करा ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर


मुंबईः महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे कळंबोली सर्कलवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून यशंवतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट उद्या मंगळवार, ११ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे.

कळंबोली सर्कलवर उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवच्या मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट (किमी १.२००) हा मार्ग ११ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल एक्झिट बंद करण्यात आल्यामुळे पनवेल एक्झिटमधून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा आणि जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या व अवजड वाहनासाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने जारी केलेली अधिसूचना कंळबोली सर्कलवरील उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे.

‘हे’ वापरा पर्यायी मार्ग

  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना किमी ९.६०० कोन फाटा येथून डावीकडे वळण घेऊन एनएच-४८ महामार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छित स्थळी जाता येईल.
  • पनवेल एक्झिटवरून तळोजा, कल्याण, शिळ फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-शीव महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एनएच-४८ महामार्गावरून इच्छित स्थळी जाता येईल.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!