एकाच तरूणाने भाजपला केले तब्बल आठ वेळा मतदान; विरोधक म्हणालेः चुनाव आयोगजी, अब तो जागिए…


नवी दिल्लीः एका तरुणाने भाजपला चक्क आठवेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक तरूण एका पाठोपाठ एक असे आठवेळा भाजपला मतदान करत असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. या व्हिडीओवरून विरोधी पक्षाने निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओत दिसणारा युवक ईव्हीएम मशीनवर जे बटन दाबताना दिसत आहे, त्या बटनापुढे उमेदवाराचे नाव मुकेश राजपूत आहे आणि त्याच्या नावापुढे कमळाचे चिन्ह आहे. मुकेश राजपूत हे उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असल्याचे सांगितले जाते.

एकाच तरूणाने भाजप उमेदवाराला तब्बल आठवेळा कथितरित्या मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडे रविवारी कारवाईची मागणी केली.

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ‘निवडणूक आयोग जी, पहात आहेत.. एक मुलगा आठ-आठ वेळा मतदान करत आहे. आता तरी जागे व्हा,’ असे काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील खारी पमारान गावातील आहे. हे गाव अलिगंज विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ फर्रूखाबाद लोकसभा मतदारसंघात येते. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान झाले आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर करत ट्विट केले आहे. ‘जर निवडणूक आयोगाला वाटले की हे चुकीचे झाले आहे, तर जरूर काही कारवाई करावी, अन्यथा नाही… भाजपची बुथ कमिटी, प्रत्यक्षात लूट कमिटी आहे,’ असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

या व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या युवकाची ओळख पटली आहे. ‘द स्क्रॉल’ने दिलेल्या वृत्तानुसार भाजपला आठवेळा मतदान करणाऱ्या त्या युवकाचे नाव राजनसिंह ठाकूर आहे. राजनचे वडील अनिलसिंह ठाकूर यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा १६ वर्षांचा आहे. अनिलसिंह ठाकूर हे खिरी पमारान गावाचे सरपंच आहेत आणि भाजपचे सदस्य आहेत. व्हिडिओत आपल्या मुलाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, असा दावा अनिलसिंह यांनी केला आहे.

फर्रूखाबाद मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार नवलकिशोर शाक्य यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी शाक्य यांनी केली आहे. राजनसिंह ठाकूरने इतर मतदारांकडून पोलचिट हिसकावून घेऊन मतदान टाकले आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी दिनेश ठाकूर यांनी त्याला मदत केली, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

संवैधानिक जबाबदारी विसरू नकाः राहुल

अखिलेश यादव यांची पोस्ट रिपोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर टिकास्त्र सोडत निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. आपला पराभव समोर पाहून भाजप जनादेश खोटा ठरवण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून लोकशाही लुटू पहात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाखाली आपले संवैधानिक कर्तव्य विसरू नका, अशी अपेक्षा काँग्रेस निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून करते. अन्यथा इंडिया आघाडीचे सरकार येताच अशी कारवाई करू की पुढे चालून कुणीही ‘संविधानाच्या शपथे’चा अपमान करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!