
पुणेः सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली हा इतिहास असतानाच आज महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुलींची पहिली शाळा फुलेंनी सुरू केली नसून थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली होती, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या दाव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आज महात्मा फुले यांची जयंती साजरी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुले वाड्यात येऊन म. फुलेंना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. स्त्री शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा फुले यांनी त्यांचे अनुकरण करून ही चळवळ पुढे चालवली, असे उदयनराजे म्हणाले.
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. एका दृष्टिकोनातून आपण पाहिले तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचे महात्मा फुलेंनी अनुकरण केले. स्त्री शिक्षणाची पहिली शाळा जर कुणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. ती देखील सातारच्या स्वतःच्या राजवाड्यात सुरू केली, असा दावा खा. उदयनराजे भोसले यांनी केला.
थोरले प्रतापसिंह महाराज यांनी साताऱ्याच्या राजवाड्यात शाळा सुरू केली होती. त्याच राजवाड्यातील शाळेत कालांतराने ज्यांनी देशाचे संविधान लिहिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले, असेही उदयनराजे म्हणाले.
म. फुले यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. शिवरायांच्या पश्चात अनेक समाजसुधारकांनी मोठे कार्य केले. त्यापैकी महात्मा फुले एक होते. म. फुलेंनी आयुष्यभर कष्ट करून संपत्ती गोळा केली. ती समाजसुधारणेसाठी वापरली, असेही उदयनराजे म्हणाले.
त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या?
दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या दाव्यामुळे ओबीसी नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी चांगलाच समाचार घेतला. म. फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली यावर उदयनराजेंचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे. आतापर्यंतचे संशोधक, इतिहासतज्ज्ञ फेल ठरले आहेत, असा टोला ससाणे यांनी लगावला आहे.
प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली होती, त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचे पुढे काय झाले? ही शाळा सुरू का राहिली नाही? त्यानंतरच्या वंशजांनी आणि उदयनराजेंनी त्यांचा शैक्षणिक वारसा पुढे का नेला नाही?, असे सवालही मंगेश ससाणे यांनी केले आहेत.
महात्मा फुले यांचे महत्व कळल्यामुळे उदयराजे हे फुले वाड्यावर आले असे वाटले होते. परंतु महात्मा फुले जयंतीच्या दिवशीच त्यांनी येथे येऊन म. फुलेंचे महत्व कमी करायचे आणि त्यांच्या पूर्वजांचे महत्व वाढवण्याचे काम केले, असेही मंगेश ससाणे म्हणाले. खा. उदयनराजे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.