नांदेडः नांदेड शहरातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना महत्वाचे यश मिळाले आहे. बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारा शार्पशूटर दीपक रंगाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. शार्पशूटर रंगाच्या अटकेमुळे बियाणी हत्याप्रकरणात महत्वाचे धागेदोरे हाती लागण्यास आणि या हत्या प्रकरणाचे खरे सूत्रधार शोधून काढण्यात यश येईल, अशी आशा तपास यंत्रणेला वाटू लागली आहे.
नांदेडमध्ये ५ एप्रिल २०२२ रोजी बिल्डर संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बियाणी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे हरविंदरसिंग रिंदा याच्या दोन शार्पशूटर्सनी बियाणी यांच्यावर जवळून गोळ्या झाडून हत्या केली होती, असा नांदेड पोलिसांचा प्राथमिक तपासातील अंदाज आहे.
बियाणी यांच्यावर गोळ्या झाडून दोन्ही शार्पशूटर फरार झाले होते. या शार्पशूटरच्या शोधात नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. एक महिन्यापूर्वी या दोनपैकी एका शूटरला गुजरातमधून अटक केली होती. दीपक सुरेश रंगा हा मात्र तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. त्याला नेपाळ सीमेवरून एनआयएने अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागण्यास मदत होणार आहे.
या हत्येचा खरा मास्टरमाइंड कोण? खंडणीसाठीच ही हत्या झाली की कोणाची सुपारी घेऊन हरविंदसिंग रिंदा याने ही हत्या घडवून आणली? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरे या अटकेमुळे तपास यंत्रणांना मिळण्याची अपेक्षा आहे.
बियाणी हत्या प्रकरणात नांदेड पोलिसांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात तपासाची चक्रे फिरवली होती. तपासादरम्यान आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सनी उर्फ इंद्रपालसिंग तिरथसिंग मेजर (वय ३५ वर्षे), गोळू उर्फ मुक्तेश्वर विजय मंगनाळे (वय २५ वर्षे), सत्ता उर्फ सतनामसिंग दलबिरसिंग शेरगिल (वय २८ वर्षे) सोनू पिनीपाना उर्फ हरदिपसिंग सतनामसिंग बाजवा (वय ३५ वर्षे), गुरी उर्फ गुरमुखसिंग सेवक (वय २४ वर्षे), करणसिंग रघबिरसिंग साहू (वय ३० वर्षे) या नांदेडमधील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रंगाविरुद्ध विविध राज्यात २५ गुन्हेः संजय बियाणी हत्याप्रकरणात एनआयएने अटक केलेला शार्पशूटर दीपक रंगाच्या विरोधात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश,बिहार या राज्यांसह विविध राज्यात आतापर्यंत २५ गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे. त्यात आता संजय बियाणी हत्याप्रकरणातही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक रंगा हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील सुर्खपूर गावचा रहिवासी आहे. १८ वर्षाचा असताना त्याने झज्जरच्या बायपासवर मोबाइल हिसकावण्यापासून गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. तेव्हा त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता.
रिंदाच्या दहशतीमुळे नांदेडचे व्यापारी भयभीतः हरविंदसिंग रिंदाची नांदेडमध्ये प्रचंड दहशत आहे. त्याच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक व्यापारी आणि उद्योजक नांदेड सोडून अन्यत्र स्थलांतरित होत आहेत. खंडणीसाठी धमकावणे, दुकानात घुसून दिवसाढवळ्या गोळीबार करणे असे प्रकार नांदेडमध्ये सर्रास होत आहेत. त्यामुळे नांदेडचे व्यापार आणि उद्योग जगत दहशतीच्या छायेखाली आहे.