परळीः परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला परळीत मारहाण करण्यात आली. या माहराणीचे पडसाद त्यांच्या गावात उमटले. या मारहाणीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी घाटनांदूर मतदान केंद्रात घुसून तोडफोड केली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना परळीतील बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मारहाण करण्यात आली. माधव जाधव यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून या मारहाणीचे पडसाद जाधव यांच्या घाटनांदूर गावात उमटले. त्यामुळे तेथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मारहाणीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी घाटनांदूर मतदान केंद्रात घुसून तोडफोड केली. त्यांनी ईव्हीएम मशीनही फोडले. त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आले होते. पोलिसांची मोठी कुमक गावात मागवण्यात आली आहे. एसआरपीएफची एक तुकडीही घाटनांदूरमध्ये तैनात करण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील घाटनांदूर ही छोटी बाजारपेठ आहे. कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड केल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठी पोलिस कुमक आल्यानंतर थांबवलेले मतदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजासाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. शरद पवार यांनी परळीत प्रचारसभा घेऊन धनंजय मुंडेंना पाडा, असे थेट आवाहनच मतदारांना केले आहे. त्यामुळे यंदाची परळी विधानसभेची निवडणूक अटीतटीची होत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी घडलेल्या प्रकारावर कारवाईची मागणी केली आहे. दहशत, दादागिरी आणि गुंडशाही असे म्हणत परळीची बदनामी करणारेच प्रत्यक्षात स्वतःच शेकडोंचा जमाव, हातात लाठ्या-काठ्या घेऊन दगडफेक करत फिरत आहेत, हल्ले करत आहेत. निवडणूक आयोगाने तत्काळ दखल घ्यावी व कारवाई करावी, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाकडून निषेध
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घाटनांदूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. अंबाजोगाई तालुक्यात परळी विधानसभा मतदारसंघात संविधानविरोधी घटकांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड केली आणि निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले, अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जाहीर निषेध करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) म्हटले आहे.