मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सकाळी पुण्यात भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच जयंत पाटील या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महाराष्ट्रात एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे, तो बरोबर नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांनाही फटकारले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज रविवारी सकाळी जयंत पाटील यांनी अमित शहा यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात गुप्त भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट घडवून आणली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी पेरल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
रोज सकाळी उठून स्पष्टीकरण देण्याचा उद्योग सुरू केला आहे का? तुम्ही बातम्या तयार केल्या तर तुम्हीच त्या बंद करा. मी कुठे आणि का गेलो याचे पुरावे दिसले किंवा माहिती मिळाली तर बातम्या करा. महाराष्ट्रात एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू झाला आहे, तो बरोबर नाही. पण सकाळपासून बातम्या पाहून माझी करमणूक होत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी रात्री दोन वाजेपर्यंत घरीच बसलो होतो. मग पुण्याला कधी गेलो? काल सायंकाळी आणि आज सकाळी मी शरद पवारांच्या घरीच होतो, मग मी कधी अमित शहांना कधी भेटलो, याचे संशोधन करा, असे टोमणेही जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना मारले.
मी अजित पवारांच्या गटात जाण्यासंबंधीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आज माझी भेट कुठलीही भेट झालेली नाही. माझी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. मी मुंबईतच आहे. शरद पवारांना काल भेटलो, आजही सकाळी भेटलो. इंडियाच्या रणनीतीवर आमची चर्चा सुरू आहे. मी शरद पवारांची साथ सोडणार या बातम्यांनी माझी करणूक होत आहे. पण या बातम्या आता थांबवा, असे पाटील म्हणाले.