बारामतीः ज्या व्यक्तीला स्वतःचाच पक्ष तिकीट द्यायलाही लायक समजत नाही, त्याच्यावर आपण काय भाष्य करायचे? अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ‘लायकी’ काढली.
कंत्राटी नोकर भरती हे महाविकास आघाडीचेच पाप आहे, असा आरोप करत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी आता नाक घासून जनतेची माफी मागावी, असे विधान केले होते. बारामतीत आल्यानंतर शरद पवारांना बावनकुळे यांच्या या विधानाबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, या गृहस्थाचे जनमानसात आणि स्वतःच्या पक्षात काय स्थान आहे, हे मला माहीत नाही. ते आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिले नव्हते. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचाच पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही, असे म्हणतो, त्याच्यावर आपण काय भाष्य करायचे? असे शरद पवार म्हणाले.
५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे वारंवार म्हणत असतात. त्याबाबत पवारांना छेडले असता ते म्हणाले की, बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. बातमी छापली जावी आणि ती लोकांनी वाचावी असे वाटत असेल तर बारामतीचा उल्लेख करावा लागतो. अखंड महाराष्ट्राला आणि देशाला बारामतीचे महत्व माहीत आहे. त्यामुळे ते बारामतीचा उल्लेख करतात. जे स्वतःच्याच पक्षाला तिकीट द्यायलाही लायक वाटत नाही, त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचे काहीच कारण नाही, असे पवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली पण…
शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी मुंबईत भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तुमची भेट झाली. प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीत समावेश होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर ‘भाजपविरोधात इंडिया आघाडीत जे जे लोक सहभागी होतील, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मी यापूर्वीच म्हटले आहे. पण कालची बैठक ही त्यासाठी नव्हती,’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये असताना ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे भाषण होते. त्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. ही भेट राजकीय नव्हती, असे पवार म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचे स्वागतच…
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये दिसणार का? या प्रश्नावर ‘याबद्दल मला काही माहीत नाही. मी त्यांच्यासोबत याबद्दल चर्चाही केलेली नाही. जर मला वैयक्तिक विचाराल तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पण हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आमच्या इतर सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल,’ असे शरद पवार म्हणाले.