
नागपूरः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीची पुराव्यानिशी चिरफाड केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे दोन लोक आपणाला भेटले होते, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.
नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, ‘ आम्ही लोकांनी हवे तसे लक्ष दिले नाही. पण आजही मला आठवतंय की, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यादी दिल्लीत दोन व्यक्ती मला भेटण्यासाठी आले होते. त्या दोन व्यक्तींनी मला सांगितले होते की, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.१६० जागांवर मतांचा फेरफार करून जिंकून देण्याचे ते सांगत होते’
मलाही आश्चर्य वाटले. स्पष्ट सांगायचे म्हणजे त्या लोकांनी जरी गॅरंटीचे सांगितले तरी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. पण अशा प्रकारचे लोक भेटत असतात. त्यामुळे मी त्या दोन लोकांकडे दुर्लक्ष केले, असेही शरद पवार म्हणाले.
त्या दोन लोकांची मी राहुल गांधी यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर त्या लोकांना जे काही बोलायचे होते, ते राहुल गांधींना बोलले. मात्र राहुल गांधी आणि माझे मत असे होते की याबाबतीत आपण लक्ष देऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्या समोर जाऊ आणि लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू, असे आम्ही ठरवले, असेही शरद पवार म्हणाले.
भाजपकडून नव्हे निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे
राहुल गांधी यांनी अतिशय मेहनत करून मतदान प्रक्रियेतील अनिमियततेबाबतची माहिती सांगितली. एका ठिकाणी एक व्यक्ती राहते. त्याच ठिकाणांहून ४० लोकांनी मतदान केले, अशा प्रकारची उदाहरणे राहुल गांधींनी दिली आहे. राहुल गांधींनी फक्त उदाहरणेच दिली नाहीत तर त्या आरोपांना आधारही दाखवला आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर खोलवर जाण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे. आक्षेप निवडणूक आयोगाबाबत घेतला, मग त्यावर उत्तर देण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी पुढे येण्याची गरजच काय? आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे, भाजपकडून नाही, असे शरद पवार म्हणाले.
ती यंत्रणा पवारांपर्यंत पोहोचली होतीः आव्हाड
शरद पवार यांच्या या खळबळजनक गौप्यस्फोटाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही दुजोरा दिला आहे. मला माहीत आहे की, दोन व्यक्ती शरद पवारांकडे गेल्या होत्या. त्यांनी मतदार याद्या मॅन्युप्युलेट करून देऊन अमूक अमूक सीट निवडून देऊ असे सांगत १६० चा आकडा सांगितला होता. मला जे पावर साहेब माहीत आहेत, त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ते बोलले असे कसे होऊ शकते. त्यांनी हा विषय काही पुढे नेला नाही. दोन व्यक्ती आल्या होत्या हे त्यांनी उभ्या जगासमोर आणि भारतासमोर सांगितले आहे. मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
