नाशिकः प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान आ. बच्चू कडू यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आ. बच्चू कडू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या फिर्यादीवरून हा एफआयआर नोंदवला गेला होता. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन आज न्यायालयाने आ. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दमदाटी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे या गुन्ह्यात आ. बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२०१७ मध्ये आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग लोकांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरोधात आंदोलन केले होते. दिव्यांगासाठी असलेला निधी महापालिका आयुक्तांनी खर्चच केलेला नाही, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या विरोधात आंदोलन केले खरे परंतु आयुक्तांनी या आंदोलनाची दखलच घेतली नव्हती.
महापालिका आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे आमदार बच्चू कडू दिव्यांगांच्या समस्या घेऊन महापालिका आयुक्तांच्या दालनात गेले. दिव्यांगांच्या मागण्या मांडत असताना आ. बच्चू कडू आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली होती. यादरम्यान आ. बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आ. बच्चू कडूंकडून पोलिस तपासावर प्रश्नचिन्हः न्यायालयाच्या या निकालानंतर आ. बच्चू यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१७ मध्ये दिव्यांग बांधवांनी नाशिकच्या महापालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन केले होते. दिव्यांगांसाठीचा निधी तीन-तीन वर्षे खर्च होत नव्हता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आम्हाला फोन केला. मला फोन आल्यानंतर आयुक्तांना मी दोन पत्रे लिहिली. पण आमदाराच्या पत्रालाही आयुक्तांनी उत्तर दिले नाही. सामान्य माणसांचा अधिकार तर खड्ड्यात गेला. त्या आयुक्ताने कायद्याची ऐशी तैशी केली, असे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दिव्यांग बांधवाच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाही, म्हणून आंदोलन करावे लागले. आम्ही मौजमजा करायला आलो नव्हतो. आम्ही आंदोलन केले म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. याउलट आमच्या आंदोलन करण्याची वेळ का आली? याचा तपास करायला हवा. हे तपासले का जात नाही?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.