नांदेडः नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात असतानाच या रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेपर्वाईची प्रकरणेही आता समोर यऊ लागली आहेत. या रुग्णालयातील डॉक्टर कोणाचा तरी वाढदिवस होता म्हणून एका रुग्णाचे सिझर सोडून गेले, वेळेत सिझर झाले असते तर बाळ आणि आई वाचली असती, असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
विजयमाला कदम नावाची महिला सात वाजता रुग्णालयात दाखल झाली. तिचे सिझर रात्री तीन वाजता करण्यात आले. कोणत्या तरी डॉक्टरचा वाढदिवस होता म्हणून रात्री तीन वाजता सिझर झाले, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. तिचे वेळेत सिझर झाले असते तर बाळ आणि आई वाचली असती. त्यामुळे या मृत्यूला डॉक्टरांची बेपर्वाई जबाबदार आहे, असे दानवे म्हणाले.
कोणाचा वाढदिवस होता आणि कोण कोण सिझर सोडून गेले होते, याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे, असे अंबादास दानवे म्हणाले.
रुग्णालयातील काही रुग्णांच्या नातेवाईकांशी बोललो. त्यांनी मला डॉक्टरांनी रेफर केलेल्या औषधांच्या पावत्या दिल्या आहेत. आम्ही डॉक्टरांशीही बोललो. डॉक्टर म्हणाले की समोर माणूस मृत्यूच्या दाढेत आहे, त्याला औषधांची गरज आहे आणि आमच्याकडे औषधे नाहीत तर मग आम्ही रेफर नाही करायचे तर काय करायचे? ७० हजार रुपयांची औषधे या कुटुंबाने खरेदी केली. यात काही डॉक्टरांची बेपर्वाई आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.
औषधांचा मुबलक साठा असल्याचे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. सरकारने रुग्णालयासाठी अधिष्ठाता नेमले आहेत. ते म्हणतात की रुग्णालयात औषधांचा साठा नाही. औषधांची मागणी नाही. पण माझ्याकडे पेपर्स आहेत. हाफकिनला साडेतीन कोटी दिलेले आहेत. दीड कोटी रुपये द्यायचे आहेत. परंतु मागच्या वर्षीची साडेतीन कोटींची औषधे आलेली नाहीत, असे दानवे म्हणाले.
डीपीसीने चार कोटी रुपये दिले आहेत, त्याची औषध खरेदी करायची आहे. त्याला सचिव मान्यता देत नाहीत. मान्यता द्यायला एक-एक वर्ष का लागते? ताबडतोब मंजुरी का केले जात नाही? काय इंटरेस्ट आहे त्यांचा? असे सवालही दानवे यांनी केले आहेत.
औषध खरेदीच्या फाईल्स एक-एक वर्ष का थांबतात? यासाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. सातशे कोटीचा आनंदाचा शिधा कधी येतो, कधी जातो, कळतही नाही. त्याचे टेंडरही निघत नाही. मग औषध खरेदीचे टेंडर निघूनही वेळ का लागतो? असे सवाल करत दानवे यांनी औषध खरेदीच्या वेळखाऊ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.