नांदेडः नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे आज (२६ ऑगस्ट) पहाटे चार वाजेच्या सुमारास हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते.
यकृतामध्ये संसर्ग झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांना कमी रक्तदाबाचा भासही होत होता. त्यामुळे नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तेथून त्यांना एअर ऍंम्ब्युलन्सने हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच वसंत चव्हाण यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खा. वसंत चव्हा यांना दरमहिन्याच्या १० तारखेला डायलिसीस करावे लागत होते. परंतु नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित चाचण्या करणे जमले नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती, अशी माहिती समोर येत आहे. नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांसाठी ही एकत्रित बैठक होती. लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्याकडे या बैठकीचे नियोजन होते. या बैठकांमुळे वसंत चव्हाण यांची दगदग आणि धावपळ झाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे २०१९ मध्ये निवडून आलेले भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहज विजयी होतील की नांदेडचे मतदार अशोक चव्हाणांना धडा शिकवतील? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटलांना धूळ चारून विजय खेचून आणला आणि वसंत चव्हा हे जाएंट किलर ठरले.
खा. वसंत चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या अमृतराव चव्हाण या राजकीय घराण्याचे प्रतिनिधी होते. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रीय होते. त्यांचा आमदारकीचा वारसा पुढे वसंत चव्हाण यांनी चालवला. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर ध्यानीमनी नसतानाही अचानक त्यांच्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची वेळ आली ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले.
सरपंच ते खासदार अशी कारकीर्द
वसंत चव्हाण हे १९७८ मध्ये नायगावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर २००२ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांना लगेच विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत राहिले. नायगावात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तारही केला आहे.
२००९ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या नव्या मतदारसंघाचे वसंत चव्हाण हे पहिले आमदार ठरले. मोठा राजकीय वारसा लाभलेल्या वसंत चव्हाणांनी नांदेड जिल्ह्यातील निवडणुका काँग्रेस अशोक चव्हाणांशिवायही जिंकू शकते, असे आश्वासक चित्र निर्माण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह आणि उमेद संचारण्याचे काम वसंत चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने करून दाखवले. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडमधील काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जमिनीशी नाळ असलेला नेता हरपला
वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वसंत चव्हाण हे जमिनीशी नाळ असलेले लोकप्रिय नेते होते. चव्हाण यांनी जीवनभर काँग्रेसच्या विचारधारेचे समर्थन आणि विस्तार केला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस परिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.