लखनऊः उत्तर प्रदेशातील विद्यार्थी आता मुघलांचा इतिहास अभ्यासणार नाहीत. मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम बदलला आहे. इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संकृतीचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांती हे धडेही वगळण्यात आले आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून हे बदल लागू करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. इंटरमिजिएटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून शासक ते मुघल दरबार हा भाग काढून टाकण्यात आला आहे. इयत्ता ११वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतीचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांती हे धडे काढून टाकण्यात आले आहेत. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही वगळण्यात आला आहे.
इयत्ता १२ वीच्या नागरिकशास्त्रातून समकालीन जागतिक राजकारणमधून समकालीन विश्वात अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हा भाग पूर्णतः वगळण्यात आला आहे. स्वतंत्र भारतातील राजकारण या पुस्तकातून जनआंदोलनाचा उदय आणि एक पक्षीय प्रभुत्वाचा कालखंड काढून टाकण्यात आला आहे. इयत्ता १० वीच्या लोकशाही राजकारण-२ मधून लोकशाही आणि विविधता, जनसंघर्ष आणि आंदोलन, लोकशाहीची आव्हाने हे धडेही वगळण्यात आले आहेत.
आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता हे शिकवले पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत, असे उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री बृजेश पाठक यांनी या निर्णयानंतर सांगितले.
अभ्यासक्रमातून इतिहास वगळून काय होणार?-सपः उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षणमंत्री नवाब इक्बाल मेहमुद यांनी टीका केली आहे. भाजपचे सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल, ते सगळे करत आहे. मात्र नुसते अभ्यासक्रमातून इतिहास वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती, हे कसे विसरता येईल?, असे मेहमुद म्हणाले. आता सरकारने अभ्यासक्रमाची सध्याची जी पुस्तके आहेत, तीही जप्त केली पाहिजेत. असे केले तरच मुघल शासकांचा इतिहास होता, हा पुरावा नष्ट होईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
भाजपकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. ताज महल, लाल किल्ला, कुतुबमिनार याचा इतिहास फक्त भारतापुरताच मर्यादित नाही तर तो इतिहास सगळ्या जगाला माहीत आहे, असेही ते म्हणाले.