एमपीएससीचा मोठा निर्णय: दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य नसलेल्या उमेदवारांना कोणत्याही नोकरभरतीत अर्ज करण्यास मनाई!


मुंबईः दिव्यांग कोट्यातून आयएएस उत्तीर्ण झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य (व्हॅलिडेट) केलेला नसेल तर दिव्यांग उमेदवारांना नोकरभरतीच्या कोणत्याही जाहिरातीला अनुसरून अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक एमपीएससीने आजच जारी केले आहे. त्यामुळे दिव्यांग कोट्यातून होणाऱ्या बनवेगिरीला चाप बसण्याची अपेक्षा आहे.

राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने २७ जून २०२४ रोजी परिपत्रक काढून दिव्यांग व्यक्तींना आरक्षणासह सर्व सुविधा व लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वावलंबन संकेतस्थळावरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिपत्रकाला अनुसरून एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यामध्ये दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यात दिव्यांग उमेदवारांचा वैश्विक ओळख क्रमांक नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेला दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र सरकारच्या स्वावलंबन पोर्टलवरून विधिग्राह्य (Validate) करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे एमपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही जाहिरातीस अनुसरून अर्ज करता येणार नाही. १ मे २०२५ पासून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरतीच्या जाहिरातीसाठी अर्ज करताना हा तपशील विधिग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. दिव्यांग उमेदवार त्याच्या खात्यात नोंदवलेला दिव्यांगत्वाचा तपशील केव्हाही विधिग्राह्य करू शकत असला तरी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व दिव्यांग उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एमपीएससीच्या वतीने करण्यात आले आहे.

कसा करायचा तपशील विधिग्राह्य?

  • स्वावलंबन पोर्टलवरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दोन्ही तपशील नोंदवणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही, परंतु राज्य सरकारच्या एसएडीएम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) नोंदवणे अनिवार्य आहे. अशा उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगत्वाचा सर्व आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावा. दिव्यांगत्वाचा तपशील नोंदवताना तो दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असल्याची खात्री करावी. उदाहरणार्थ- दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, दिव्यांगत्वाची टक्केवारी, वैश्विक ओळखपत्र क्रमांक, वैश्विक ओळखपत्र वितरणाचा दिनांक इत्यादी तपशील ओळखपत्राप्रमाणेच असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांगत्वाचा सर्व तपशील नोंदवल्यानंतर ‘Validate’ या बटनवर क्लिक करावे.
  • उमेदवारांचे वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार व दिव्यांग स्थिती (कायमस्वरुपी/ तात्पुरती) इत्यादी तपशील दर्शवले जाईल व हा तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतर दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उमेदवारांच्या खात्यामध्ये नमूद जन्म तारीख व वैश्विक ओळखपत्रावर नमूद जन्म तारीख एकच असणे आणि दिव्यांगत्वाचा तपशील अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!