पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची एमपीएससीने गंभीर दखल घेतली असून परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमपीएससीच्या वतीने राज्यातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या सहा परीक्षा केंद्रांवर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. या परीक्षेदरम्यान एक उमेदवार ब्लूटूथचा वापर करत असल्याचे आढळून आले होते. त्याच्या विरोधात आता एमपीएससीने कारवाई केली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लूटूथजवळ बाळगल्याबद्दल श्री सचिन नवनाथ बालगाने या उमेदवारावर फौजदारी गुहा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एमपीएससीने ट्विट करून दिली आहे. २१, २२ आणि २३ जानेवारी असे तीन दिवस राज्यातील सहा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे.