औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकः महाविकास आघाडीचे विक्रम काळेंना ६ हजार ५२१ मतांची आघाडी


औरंगाबादः औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून आतापर्यंत मोजणी झालेल्या मतांच्या आकडेवारीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी ६ हजार ५२१ मतांची आघाडी घेतली  आहे. विशेष म्हणजे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव हेही या निवडणुकीत ताकदीने पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. एकूण ५६ टेबलांवर ही मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी ७०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी वैध आणि अवैध मते ठरणे अद्याप बाकी असल्यामुळे विजयासाठीचा कोटा अद्यापही निश्चित करण्यात आला नाही.

मतमोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता यावी म्हणून विजयासाठीचा कोटा निश्चित होण्याआधीच मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीपैकी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी  पहिल्या पसंतीची १९ हजार ७६८ मते मिळवली आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना १३ हजार २१६ मते मिळाली असून भाजपचे उमेदवार किरण पाटील डोणगावकर यांना १३ हजार २४७ मते मिळाली आहेत. प्राप्त आकडेवारीनुसार सध्या विक्रम काळे हे ६ हजार ५२१ मतांची आघाडी घेऊन सर्वांच्या पुढे आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी चांगलीच मुसंडी मारलेली पहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीतही सूर्यकांत विश्वासराव रिंगणात होते. त्यावेळी त्यांना  एकूण ७ हजार ५०० च्या आसपासच मते मिळाली होती. यावेळी त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्यामुळे आणि मराठवाडा शिक्षक संघाचे जाळे मराठवाडाभर पसरलेले असल्यामुळे विश्वासराव यांनी मारलेली मुसंडी या निवडणुकीच्या निकालात रंगत आणणारी ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!