पुणे/जालनाः मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे राज्यभर हे आंदोलन चिघळले असून संपूर्ण राज्यात या लाठीमाराचे पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या ३५० हून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे हे आंदोलन चिघळत चालले असतानाच सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली नाही. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर या प्रश्नावर मौन बाळगून थेट पळ काढला. चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात आणखीच भर टाकणारी ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाला दुसऱ्या समाजाचा वाटा देण्यास म्हणजेच ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना काल शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल ३५० हून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलक आणखीच खवळले आहेत.
एकीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर हिंसक रुप धारण करत असताना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात या प्रश्नावर रितसर मौनच धारण करून काढता पाय घेत पळ काढला. पुण्यात पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारताच त्यांनी मौन धारण करत काढता पाय घेतला. आरक्षण समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी भूषवणाऱ्या व्यक्तीनेच अशा पद्धतीने काढता पाय घेतल्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. चंद्रकांत पाटलांची ही कृती मराठा आंदोलकांच्या संतापात आणखीच भर टाकणारी ठरण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला दुसऱ्या समाजाचा ‘वाटा’ देण्यास भाजपचा विरोध
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर भाष्य केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, कुठल्या समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे म्हणजे तेढ निर्माण करणारे ठरले. अनेक आरक्षण कायम आहेत. सरकारला काही निर्णय घ्यावे लागतील. नियम पाळावे लागतील. केंद्र सरकारला बोलतील. मात्र एका समाजाचा वाटा दुसऱ्या समाजाला देणे योग्य वाटत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. म्हणजेच मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी राज्यात मराठा समाजाची आंदोलने झाली. मोठमोठे मोर्चे निघाले. मात्र आताच गालबोट कसे काय लागले? असा सवालही त्यांनी केला आहे.
‘चंद्रकांतदादा भूमिका घेणार आहेत की नाही?’
संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जबाबदार सरकारचे मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. पण चंद्रकांत पाटील कुठे आहेत? चंद्रकांतदादा याबाबत काही भूमिका घेणार आहेत की नाही? न्यायालयामध्ये विषय प्रलंबित असताना आंदोलन का होत आहे? सरकार न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा करत आहे की नाही? जर सरकार पाठपुरावा करत असेल तर आंदोलन, उपोषण का होत आहेत? सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही तर त्यांना निव्वळ जाती-जातीमध्ये, समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करायचे आहे, असे थेट सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विचारले आहेत.
सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीतः शरद पवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांची भेट घेतली. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणे झाले. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचे ठरले. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. परंतु जे काही ठरले होते, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मनोजने आपण मराठा समाजासाठी पडेल ती किंमत द्यायचा निर्णय घेतला आणि उपोषणाचा कार्यक्रम घेतला, असे शरद पवार यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
पोलिस बळाचा वापर अयोग्यच
आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी काल सर्व माहिती घेतली. मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलिस आले. त्यांनी बोलणी केली. प्रश्न समजून घेण्यासाठी लोकशाहीत अधिकार असतो. आंदोलकांनी कोणताही कायदा हातात घेतला नाही. कोणताही दंगा केला नाही. असे असताना पोलिस बळाचा वापर करणे योग्य नाही. पोलिस बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले.