मराठवाड्यातील ६, विदर्भातील एक जिल्हा भूकंपाने हादरला, जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश


मुंबई: हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भुकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली.

 मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून बचावासाठीच्या दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. 

राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

 

काय खबरदारी घ्याल? 

हिंगोली  जिल्ह्यात कळमनुरी येथे भुकंपाची नोंद झाली. ह्या भुकंपाचे सौम्य धक्के नांदेड, परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जाणवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गंगापूर, पैठण व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील काही गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे संबंधित तहसीलदारांनी कळविले आहे. तथापि, या सौम्य धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. असे असले तरी भुकंपाच्या वेळी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरणाने सूचना निर्गमित केल्या आहेत- 

१.नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे.

२.ज्यांनी घराच्या पत्र्याच्या छतावर आधारासाठी दगड ठेवले असतील त्यांनी ते दगड त्वरीत काढून घ्यावे.

३.भूकंपादरम्यान  घरात असल्यास  सुरक्षित ठिकाणी जसे टेबल, तुळई, दरवाजाची चौकट अशा ठिकाणी  आसरा घ्या. 

४.लिफ्ट्चा वापर करु नका, दाराजवळ गर्दी करु नका.

५.भूकंपादरम्यान रस्त्यावर असाल तर त्वरित मोकळ्या जागी जा. उंच जुन्या सलग इमारती , भिंती व विजेच्या तारांपासून दूर रहा.

६.रेडिओ, टिव्ही वरुन मिळणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विषयक सुचनांचे पालन करा.

७.अफवांवर विश्वास ठेवू नका.

८.पाणी, वीज, गॅस कनेक्शन सुरु असल्यास तात्काळ बंद करा.

९.शोध व बचाव पथकास सहकार्य करा.

अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!