छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) अध्यक्षपदी कौतिकराव ठाले पाटील यांची पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली आहे. ठाले पाटील हे सलग सहाव्यांदा मसापचे अध्यक्ष बनले आहेत. आसाराम लोमटे आणि रामचंद्र तिरूके यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मसापच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंच पॅनल आणि कौतिकराव ठाले पाटलांच्या नेतृत्वातील मसाप संस्थासंवर्धक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ठाले पाटलांच्या नेतृत्वातील संस्थासंवर्धक पॅनलने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
मसापच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवारी ना. गो. नांदापूरकर सभागृहात बैठक घेण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्यांनी एकमताने कौतिकराव ठाले पाटील यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड केली.
मसापची नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी- अध्यक्षः कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्षः आसाराम लोमटे, रामचंद्र तिरूके, कार्यवाहः डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्षः डॉ. रामचंद्र काळुंखे, सहसचिवः डॉ. गणेश मोहिते, दीपा क्षीरसागर.
डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते आणि दीपा क्षीरसागर या तीन नवीन सदस्यांना कार्यकारिणीवर महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. या बैठकीला कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, अनंत कराड, देविदास फुलारी, दगडू लोमटे, आसाराम लोमटे, रामचंद्र काळुंखे, दीपा क्षीरसागर, डॉ. गणेश मोहिते, संजीवनी तडेगावकर, संतोष तांबे, सुभाष कोळकर, सरोज देशपांडे, किरण सगर, नितीन तावडे, जयद्रथ जाधव, हेमलता पाटील, संजीव कुलकर्णी रामचंद्र तिरूके आणि नामदेव वाबळे यांची उपस्थिती होती. कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ठाले पाटील गटाने एकहाती विजय मिळवला होता. सलग सहाव्यांदा ठाले पाटील ‘मसाप’च्या अध्यक्षपदी निवडले गेले आहेत.