छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीतून प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी माघार घेतली आहे. परंतु त्यांनी मसापच्या एकूणच कार्यपद्धतीवर केलेल्या गंभीर आरोपांवर मसाप आणि ठाले मास्तर म्हणून परिचित असलेले मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी धारण केलेले मौन संशय कल्लोळ निर्माण करणारे ठरू पहात आहे. प्रा. अहिरेंनी केलेले आरोप मसाप आणि या संस्थेच्या धुरिणांनाही मान्य आहेत की काय? असा अर्थ त्यातून काढला जाऊ लागला आहे.
मसापच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वात संस्थासंवर्धक अराजकीय पॅनल आणि आरएसएसचे प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वातील मसाप परिवर्तन मंच पॅनल मैदानात उतरले आहेत. आरएसएस-भाजपप्रणित डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वातील पॅनलमध्ये प्रसिद्ध विद्रोही कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, आंबेडकरी कवि-लेखक प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे, प्रा. डॉ. मोहन सौंदर्य आणि कवि बबन मोरे हे उमेदवार आहेत. आरएसएस-भाजपप्रणित नेतृत्वाच्या झेंड्याखाली हे आंबेडकरी कवि-लेखक कसे? असा प्रश्न न्यूजटाऊनने उपस्थित केल्यानंतर प्रा. डॉ. अहिरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
न्यूजटाऊनच्या वृत्तावर आपली भूमिका मांडताना प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी ६ ऑक्टोबर रोजी मसापच्या एकूणच कार्यपद्धतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. त्यांचे हे आरोप मसाप, कौतिकराव ठाले पाटील किंवा मसाप संस्थासंवर्धक पॅनलच्या एकाही उमेदवाराने खोडून काढले नाहीत. आता प्रा. अहिरे यांनी मसापच्या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी मसापच्या कार्यपद्धतीवर केलेले आरोप मात्र कायम आहेत. त्या आरोपांवर मसाप आणि कौतिकराव ठाले पाटलांनी धारण केलेले मौन मसापच्या एकूणच व्यवहाराबाबत संशय कल्लोळ निर्माण करणारे ठरू पहात आहे.
काय आहेत प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे यांचे आरोप?
- वर्तमान मसाप संवैधानिक चौकट मानणारी संस्था आहे, असा केवळ भास आहे. प्रत्यक्षात तिची कार्यप्रणाली लोकशाही स्वरूपाची नाही. निवडणूक, मतदारयादी, मतदान प्रक्रिया, मतपत्रिका संकलन, निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती सगळीच एकाधिकारशाही आहे.
- आजपावेतो ज्या पद्धतीने सदस्य केले गेले ती पद्धतही सदोष आहे. साहित्य परिषदेच्या मतदारांसाठी वाचक, लेखक, समीक्षक असणे असा निकष असावयास हवा, मात्र तेथे वयाचा निकष ठेवण्यात आलेला आहे.
- हेही वाचा: मसाप निवडणूकः प्रतिभा अहिरे म्हणतात, ‘परिवर्तन मंचमध्ये प्रतिगामी विचारधारेचा लवलेशही नाही, झेंडा-दांड्याची भाषा ध्रुवीकरणासाठीच!’
- वर्षानुवर्षे काही विशिष्ट व्यक्तींच्या हाती मसाप अंकीत आहे. कंपुगिरी, लॉबिंग सुरू आहे.
- नैवेद्य दाखवावा तसे दलित, वंचितातील काही सदस्य जवळ बाळगलेले असतात. परिघाबाहेरील प्रतिभावंताना, नवीन कवी, लेखकांना सामावून घेतले जात नाही. संधी दिली जात नाही.
- निवडणुकीत संवैधानिक पद्धतीने आदर्श आचारसंहिता अवलंबली जात नाही. आरक्षणाचे तत्व लागू केले जात नाही. अशा पद्धतीने मतदार केले आहेत की, त्या ठराविक कंपूखेरीज इतर कुणीही मसापमधे निवडून येऊच शकणार नाहीत.
- मसापची निवडणूक कधीच पारदर्शक नव्हती व आताही होणार नाही. गेली तीस-अडीस वर्षे एकाच मठाधिपती व त्यांच्या सोयीच्या माणसांनी मसापवर ठिय्या मांडला आहे.
- हेही वाचाः Breaking News:विद्रोही कवयित्री प्रतिभा अहिरे यांची ‘मसाप’च्या निवडणुकीतून माघार, न्यूजटाऊनच्या भूमिकेचा मोठा विजय!
- लोकशाहीच्या मूल्यांना बासनात गुंडाळून गेली अनेक वर्षे मसापमध्ये असाहित्यिक व्यवहार मग्रुरीने सुरू आहे. निवडणुकीस इच्छूक उमेदवारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन धमकावले जाते. तुला दहाच मते मिळतील, मग कशाला लढवतो निवडणूक? असे म्हणून हतोत्साहित केले जाते.
- मसापमध्ये एकाधिकारशाही आहे. जातीवाद/दुजाभाव केला जातो. मसापचा मतदार विकल्या गेल्याप्रमाणे कोऱ्या मतपत्रिका या विशिष्ट कंपूच्या ताब्यात देतो. त्यामुळे या कंपूशिवाय मसापच्या निवडणुकीत दुसरा कोणीही निवडून येऊच शकत नाही.
- मसापमध्ये एकानुवर्ती, समता, न्याय, बंधुता याला न मानणारे साहित्यिक व्यवहार होतात.
असे गंभीर आरोप करत प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मसापमधील ‘असांसदीय’ व ‘असाहित्यिक’ व्यवहार जगापुढे मांडला आहे. परंतु त्यांच्या या आरोपांवर मसाप किंवा या मसापचे धुरिण कौतिकराव ठाले पाटील यांनी चकारशब्दही काढलेला नाही. आता प्रा. डॉ. अहिरे यांनी मसापच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असली तरी त्यांच्या आरोपांचे ‘किटाळ’ घेऊनच मसाप संस्थासंवर्धक पॅनल पुढील पाच वर्षे मसापवर सत्ता गाजवणार आहे का? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे.