मराठवाडा साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वात मसाप संस्थासंवर्धक अराजकीय पॅनल आणि आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक डॉ. सर्जेराव जिगे यांच्या नेतृत्वात परिवर्तन मंच पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परिवर्तन मंच पॅनलप्रमुख डॉ. जिगे, उमेदवार प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी मसाप आणि ठाले-पाटील यांच्यावर ‘एकाधिकारशाही’ व ‘असांसदीय’ व्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचा मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे उमेदवार प्रा. डॉ. गणेश मोहिते यांनी केलेला हा प्रतिवाद…
डॉ. गणेश मोहिते,
मसाप संस्थासंवर्धक पॅनलचे उमेदवार
मराठवाडा साहित्य परिषदेची निवडणूक आली की काही हौश्यांना आपण साहित्यिक, विचारवंत(?) असल्याची पंचवार्षिक आठवण येते आणि ते परिषदेच्या ‘सहिता’(?)साठी अध्यक्ष होण्याच्या ‘लालसेतून’ उमेदवारी घोषित करतात. हे आता नवीन नाही. मसापचा मराठवाड्यातील कोणताही सभासद निवडणूक लढू शकतो आणि कोणीही १८ वर्षावरील योग्य व्यक्ती सभासद होऊ शकते. या मसापच्या घटनेतील खुल्या ‘अवकाशा’ मुळे हे शक्य होते. याचा अशा लोकांना विसर का पडावा? हा प्रश्नच आहे.
निवडणूक म्हटले की, असे होणारच हे गृहीत धरून त्याची दखल परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात नाही. विद्यमान पदाधिकारी परिषदेसाठी किती काम करतात, त्यांच्या परिश्रमाने मराठवाडा साहित्य परिषदेने किती उंची गाठली, किती वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले, विविध समाज घटकांतील अनेक गुणवंत माणसांना साहित्यप्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला या वाङ्मयीन व्यवहाराची समज असणाऱ्या मंडळींना हे सांगावे लागत नाही.
या ‘संस्थावर्धक‘ दृष्टेपणाची दखल वाङ्मयीन व्यवहाराचे नेटके भान असणाऱ्या मंडळींना आहे. म्हणून ‘सुमार‘ असणाऱ्या पोरकट, संधिसाधू लोकांना उत्तरे देण्यात आमचा वेळ व्यर्थ घालू नये या मताचे ते व आम्ही आहोत. अशा लोकांना ऐनकेन ‘प्रसिद्धी‘ हवी असते. प्रसिद्धीला ते ‘परिवर्तन‘ संबोधतात. त्यासाठी विविध लोकांचे कडबोळे तयार करतात, यांना कसली आली विचारधारा वगैरे?
फुले-शाहू-आंबेडकरांच्या जीवनधारणा आणि विचार कळण्यास देखील विशिष्ट पातळी असावी लागते. आजच आमच्या ७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत हे मान्य करून आपण पुढे जाऊयात. टिकाटिप्पणी करण्यात, वेळ दवडण्यात फार शहाणपण नाही. म्हणून आम्ही हे प्रसिद्धीलोलुप शंकेखोर व खोटेनाटे प्रश्न याकडे दुर्लक्ष करतो. याचा अर्थ खंडन करणे किंवा उत्तर देणे आम्हाला जमत नाही असे नाही.
लोकशाही प्रक्रिया म्हणून आम्ही या निरनिराळ्या विचारांचे स्वागत करतो. त्यापैकी कोणावरही टिकाटिप्पणी केली नाही. किंवा त्यांच्या लहान-मोठ्या साहित्य संस्था, संघटना त्यांचे काम यावर आम्ही एकतर बोलत नाही. नाही तर खुल्या मनाने स्वागत करतो. सरकारच्या कृपेने ते ज्या प्राधिकरणावर गेले त्यावर किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरही आम्ही बोलत नाही. वस्तुत: त्यांच्या कामाची मोठी चिरफाड करता येवू शकते. मात्र आमची वृत्ती छिद्रान्वेषी नाही.
मराठवाडा साहित्य परिषदेचे भौतिक, वाड्मयीन, सांस्कृतिक कार्य लोकांसमोर ठळकपणे उभे आहे. तिचा झालेला विकास सर्व महाराष्ट्राने मान्य केलेला आहे. साहित्य परिषदेने मराठवाडा व मराठवाड्याच्या सीमा भागापर्यंत सर्वदूर लेखक, कवी, अभ्यासक यांना संधी देवून बोलते व लिहिते केलेले आहे व लिहित्या गुणवान हातांचा गौरव, सन्मानच केलेला आहे.
एखादी संस्था काम करीत असताना कोणत्याही काळात काही समांतर संस्था निर्माण होत असतात. हे उघडच आहे. अशा समांतर संस्थांचे साहित्य परिषद सतत सतत स्वागत करीत आली आहे. किंबहुना त्यांना उत्तेजन देखील देत आलेली आहे. ‘आम्ही आणि ते’ ‘आमची संस्था आणि त्यांच्या संस्था’ असा दुजाभाव मराठवाडा साहित्य परिषदेने केलेला नाही.
साहित्य संस्था या केवळ लेखकांच्या असतात हा भ्रम आहे; खरे पाहता साहित्य संस्था या रसिकांच्याही असतात याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करुन साहित्य परिषद पदाधिकाऱ्यांवर टीका केली जाते. मोघमपणे आरोप करण्याची राजकारणाची पद्धत आता इतर संस्थांचे सभासदही वापरू लागले आहेत, त्यातलाच हा प्रकार आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यप्रणाली, आताची निवडणूक प्रक्रिया ही मराठवाडा साहित्य परिषदेच्या घटनेप्रमाणे निर्वाचन अधिकारी घेत आहे. नियमाप्रमाणे निवडून आलेले सदस्य लोकशाही पद्धतीने ही संस्था चालवतात. मराठवाडा साहित्य परिषदेने गेल्या २५-३० वर्षांत आपला ग्रामीण भागात विस्तार, विकेंद्रीकरण, उपक्रमांची विविधता आणि त्यांची संख्यात्मक व गुणात्मक वाढ केलेली आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेने विश्व मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन आणि लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडलेल्या व्यक्तींची नावे जरी नजरेसमोर आणली तरी सर्वसमावेशकता सहज लक्षात येते. उदा. गंगाधर पानतावणे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसह असंख्य उदाहरणे आपणांस देता येतील. भारत सासणे, प्र.ई.सोनकांबळे, नागनाथ कोत्तापल्ले, नरेंद्र चपळगावकर, अनुराधा वैद्य, रेखा बैजल, सुहासिनी इर्लेकर, छाया महाजन, उषा दराडे, ऋषिकेश कांबळे, दत्ता भगत, यु. म. पठाण, फ.मु.शिंदे, लक्ष्मीकांत देशमुख अशा अनेक मान्यवरांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदे भूषवली आहेत. ते साहित्य परिषदेच्या विद्यमान अध्यक्षाच्या खुल्या भूमिकेमुळे हे या तथाकथित टिकाकारांच्या लक्षात येत नाही, हे आश्चर्य आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागील निवडणुकीत आमच्याविरुद्ध उभे असलेल्या सभासदांना निवडणुकीनंतर खुलेपणाने संधी दिल्या आहेत. हे ते स्वतःही नाकारू शकणार नाहीत. बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्जेराव जिगे तर यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवाजी हुसे, अमळनेर येथील संमेलनात भारत सातपुते यांचाही सहभाग होता. हे आरोप करताना ते कसे विसरतात? जे पराभवाच्या छायेत असतात ते असे आरोप करतच असतात हे सांगण्याची गरज नाही.
साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नेहमीच मराठी वाचक, रसिक, लेखक, कवी, अभ्यासक यांच्याबद्दल सन्मानाची आणि आदराची भावना ठेवली आहे. ‘परिघाबाहेरचे साहित्य हुंकार’ शोधून त्यांना विविध उपक्रमांतून रसिक-वाचकांसमोर आणण्यासाठी कायम आग्रही राहिलेले आहेत. असा चौफेर विचार करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव साहित्य संस्था आहे.
मसाप नियमितपणे मराठवाडा साहित्य संमेलने, लेखिका साहित्य संमेलने, चर्चासत्रे, व्याखानमाला, स्वागत आणि साक्षात असे उपक्रम घेऊन लेखक-कवींना संधी उपलब्ध करून देते. पण याकडे पाहण्यासाठी एक ‘डोळस’ दृष्टी आणि खुले मन लागते. त्याचा अभाव अलीकडे सार्वत्रिक दिसतो. निवडणूक लढवणाऱ्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यामध्ये असावे याचा विषाद वाटतो.
साहित्य परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचा पूर्वापार कुठेही उल्लेख नव्हता व नाही. निवडणूक काळात, शासनाकडून, साहित्य महामंडळाकडून आलेल्या गोष्टींची पूर्तता केली नाही तर साहित्य परिषदेची, साहित्यिकांचे, प्रकाशकांचे मोठे नुकसान होवू शकते. हे लक्षात न घेता, घटनेचा अभ्यास न करता केवळ प्रसिद्धीसाठी निवडणूक काळात असे आरोप करणाऱ्यांचा एक वर्ग असतोच. या वर्गाकडे दुर्लक्ष करणे हेच साहित्य परिषदेच्या हिताचे आहे!
(लेखक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील देवगिरी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.)