‘अभिजात’ मराठीचे इंग्रजीपेक्षा श्रेष्ठत्व मनामनात पेरले तरच निभाव शक्य!


कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरवण्यासाठी त्या भाषेच्या ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते. तेव्हा मराठी भाषा फक्त राजभाषा नाही तर ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा ध्रुवीकरणाच्या काळात मराठी जर ज्ञान भाषा झाली नाही तर तिचा सामान्य भाषा ही म्हणून ही निभाव लागणार नाही. यासाठी मराठीची केवळ सक्ती करून चालणार नाही तर आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर मराठी कशी उतरेल हे पाहणे महत्वाचे आहे.

  • सुनील कुवरे, शिवडी

दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या भाषा दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज १२ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. लोकसंख्येच्या निकषानुसार मराठीला जगातल्या २० प्रमुख भाषांमध्ये स्थान आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षांपासूनची होती.अखेर ती ३ ऑक्टोबर २०२४ घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केंद्र सरकारने केली.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे.

मराठी भाषेबरोबरच पाली, बंगाली, ओडिया आणि प्राकृत या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मात्र, अवघ्या महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी आणि जगभरात पसरलेल्या लाखो मराठी भाषिकांचे मन आनंदाने भरून आले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्यात अनेक ठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला. सरकारी घोषणेने मराठी माणसाच्या लोक भावनेला हात घातला गेला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रा.रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या समितीच्या प्रयत्नांना अकरा वर्षांनंतर यश मिळाले.

मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. आता भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. मराठी भाषेचा अभिजात भाषेच्या श्रेणीत समावेश झाल्याने त्या भाषेच्या क्षेत्रात विशेषतः शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. मराठी भाषेमधील प्राचीन ग्रंथसंपदेचे जतन, दस्तऐवजीकरण करणे, भाषा भवन उभारणे, भारतातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे, भाषा भवन उभारणे तसेच मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी अंदाजे पाचशे कोटी रुपये मिळतील.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मराठी भाषेच्या वापराबाबत अधिक सजग होत आहे. नुकताच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच सरकारी कामकाजात आणि संभाषणसुध्दा मराठी बोलण्याचा आदेश जारी करण्यात आला. हा निर्णय स्वागतार्ह आहे. मराठी ही राजभाषा असून प्रशासकीय कामकाज मराठीतूनच होते तरीही राज्य सरकारला मराठी भाषेचा वापर करण्यासाठी आदेश काढावा लागला, हा मोठा विरोधा भास आहे.

आपण मराठी भाषेची लढाई जिंकली. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेची गळचेपी होत आहे. दैनंदिन व्यवहारातून मराठी भाषेचा वापरही कमी होत असल्याची खंत व्यक्त होत होती. मुंबईसह अनेक ठिकाणी मराठी भाषिकांचा अवमान केला जात आहे. हिंदी बोलण्याची सक्ती केली जात आहे. त्याचे काय? मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मान मिळाला पाहिजे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचा प्रभाव वाढेल पण केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरवण्यासाठी त्या भाषेच्या ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते. तेव्हा मराठी भाषा फक्त राजभाषा नाही तर ज्ञानाची भाषा, व्यवहाराची भाषा व्हायला हवी. भाषा ध्रुवीकरणाच्या काळात मराठी जर ज्ञान भाषा झाली नाही तर तिचा सामान्य भाषा ही म्हणून ही निभाव लागणार नाही. यासाठी मराठीची केवळ सक्ती करून चालणार नाही तर आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर मराठी कशी उतरेल हे पाहणे महत्वाचे आहे.

आज जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ज्या भाषेतून प्रकट होते ती भाषा जगावर अधिराज्य करते. मराठीला वैभव प्राप्त करायचे असेल तर विज्ञान-तंत्रज्ञान विकसित करून मराठी भाषिकांनी शोध लावले तरच मराठी भाषेचे शैक्षणिक महत्त्व वाढेल. ज्ञानभाषा म्हणून सुद्धा महत्त्व प्राप्त होऊन भविष्यात ज्ञानभाषा नक्की बनू शकते. बदलत्या काळानुरूप शब्द समृद्धता आणावी लागेल. इंग्रजी ही केवळ नोकरीची भाषा आहे. मराठी त्याहून श्रेष्ठ आहे हा विश्वास मनामनात पेरावा लागणार आहे. तरच मराठीला भवितव्य आहे. तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेचे संवर्धन करून ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ही अभिजात भाषा पोहचवणे आवश्यक आहे. तसेच ज्ञानभाषा होण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषेत अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!