छत्रपती संभाजीनगरात बनावट दस्तऐवजांआधारे अकृषि परवाने देऊन विकास आराखड्यात हेराफेरी, विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करुन व दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या गैरप्रकारामुळे शासनाची आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. त्यामुळे याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी नगररचना विभागाच्या संचालकांना दिले आहेत.

याबाबत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (AMRDA) कार्यालयामध्ये कार्यरत असणारे नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बाबींना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्राप्त प्रकरणांची चौकशी करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे इत्यादी प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

स्वतःहून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने अथवा संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केल्या जात नसल्याने मंजूर आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुचित फेरबदल होत असल्याने विकास आराखड्याचा मूळ उद्देश साध्य होणार नाही, अशी आपली धारणा असल्याचेही विभागीय आयुक्त अर्दड यांनी संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महानगराबाबतीत अत्यंत महत्त्वाचा विषय हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ शी निगडीत असल्याने व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने तसेच या गैरप्रकारामुळे शासनाची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे.

महानगराच्या नियोजनबध्द विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास प्रतिकूल ठरत असल्याची शक्यता व्यक्त करून याबाबत आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही अर्दड यांनी नगर रचना विभागाच्या संचालकांना कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!