मुंबईः गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र आज जाहीर करण्यात आले. या सूत्रानुसार शिवसेना (उद्धव ठाकरे) सर्वाधिक २१ जागा, काँग्रेस १७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) १० जागा लढवणार आहे. काँग्रेसने सांगलीवरचा हक्क सोडला असून ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. तर भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे.
मुंबईतील शिवायलयात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी कोणता पक्ष कोणता जागा लढवणार याची यादी वाचून दाखवली.
कोण लढवणार कोणत्या जागा?
काँग्रेस-१७
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, मुंबई उत्तर.
राष्ट्रवादी काँग्रेस-१०
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.
शिवसेना-२१
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हाकणंगले, संभाजीनगर (औरंगाबाद), शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.
काँग्रेसने सांगलीवरचा दावा सोडला
गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. या जागेवर उद्धव ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता तर सांगली आमचीच असा दावा काँग्रेस नेते करत होते. अखेर ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्यामुळे आता स्थानिक नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.