मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर श्रद्धास्थानांबद्दल राज्यपाल आणि इतर सत्ताधारी नेते अवमानकारक वक्तव्य करत आहेत. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून त्याविरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले. या मोर्चात सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी ही घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.
हा मोर्चा केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्यासाठी नाही तर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या सर्वांच्या विरोधात हा मोर्चा असेल. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, शक्तीचे विराट दर्शन घडवण्यासाठी हजर राहा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपमधील शिवप्रेमींनी, महाराष्ट्राचा अपमान ज्यांना पटत नाही त्यांनीदेखील यावं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यपाल म्हणून कोणीही येतात. कोठूनही पाठवले जातात. राज्यपाल आहे म्हणून मान राखला जातो. पण हेच राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. त्यांनी मुंबई आणि ठाण्याबद्दल केलेले वक्तव्य महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी करण्यात आले होते. यांना एकूणच महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि महत्व छन्नविछिन्न करून टाकायचे आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
गद्दारी आणि कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल अजून लागायचा आहे. पण ते अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान करण्यात येत आहे आणि फुटीरतेची बीजे टाकण्यात येत आहे. काही गावे कर्नाटकात, काही गावे तेलंगणात तर काही गावे गुजरातमध्ये जायचे म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधीच घडले नव्हते. छत्रपतींचा एकसंध महाराष्ट्र तोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे, असे टिकास्त्रही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर सोडले.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तोडण्याचा कट असण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावरही ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकार नेभळट असल्याची टिकाही त्यांनी केली. यावेळी अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले. सीमा भागात आजपर्यंत अशी फुटीची भावना कधीच निर्माण झाली नव्हती, ती आजच का होतेय? असा सवाल पवार यांनी केला.
आधीच दिला होता अल्टिमेटमः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य श्रद्धास्थानांचा वारंवार अपमान केला जात असल्यामुळे हटवण्यात आले पाहिजे. दोन-चार दिवस काय होते ते पाहू या. अन्यथा सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन मोर्चा काढायचा की महाराष्ट्र बंद ठेवायचा हे ठरवू या, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. तरीही कोश्यारी राज्यपालपदावर कायम राहिल्याने मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे.