मुंबईः महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस होऊ लागल्यामुळे वातावरणात बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळून पिकांच्या नासाडीचा धोका घोंगावू लागला आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजपासून ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या तिन्ही विभागात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्याच्या काही भागांत तुरळक ठिकाणी ५ एप्रिलपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस तीव्र हवामानाचा अंदाज अपेक्षित आहे.
पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या मिलन झाल्यामुळे कोनीय स्थिती निर्माण झाली असून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून तामीळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे या भागात दमट वारे निर्माण झाले आहेत. परिणामी महाराष्ट्रात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
४ एप्रिल,मंगळवारः विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
५ एप्रिल, बुधवारः उद्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
६ एप्रिल, गुरुवारः मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल.
७ एप्रिल, शुक्रवारः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.