एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, राजभवनावर घडामोडींना वेग; पुढचा मुख्यमंत्री कोण? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच


मुंबईः एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी १४ वी विधानसभा विसर्जित केली आहे. राज्यपालांनी शिंदेकडेच काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. नवीन मुख्यमंत्री होईपर्यंत शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून करतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी ११ वाजता राजभवनावर पोहोचले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत आज संपत आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांनी राजीनामे दिले. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी १४ वी विधानसभा विसर्जित केली आणि शिंदे यांच्याकडेच काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली.

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द करताच १४ वी विधानसभा विसर्जित झाली. आता पुढचा मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही तर नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे कोणते पद असणार? उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला ते तयार होतील का? याबाबतच्याही चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे चार माजी खासदार आणि सात आजी खासदारांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. मोदींचे आभार मानण्यासाठी मोदींच्या भेटीची वेळ मागण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग करण्यासाठीच शिंदे सेनेच्या खासदारांनी हा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे. आता प्रधानमंत्र्यांना भेटून शिंदे सेनेच्या हाती नेमके काय लागणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

…तर तिसऱ्याचाच लाभ?

शिंदे सेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. तर १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच रहावे, अशी भाजपची इच्छा आहे. महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यामुळे महायुतीतील एक घटक पक्ष सोबत असल्यामुळे फडणवीसांचे पारडे जड झाले आहे.

महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा वाद लवकर सुटला नाही आणि हा वाद जास्त काळ चालला तर मात्र तिसऱ्याचाच लाभ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. म्हणजे ऐनवेळी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांचे नाव पुढे केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी शिंदेंचे ट्विट

मुख्यमंत्रिपद मिळणार की नाही याबाबत साशंकता असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी एक ट्विट केले आहे. ‘महायुतीच्या प्रचंड विजयानंतर पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे मी आवाहन करतो,’ असे एकनाथ शिंदे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *