मुंबईः विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटत चालले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा सुटण्यास तयार नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकलेला भाजप कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. तसा संदेशच भाजप नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आला असून मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांना भाजपकडून ‘एक्सचेंज ऑफर’ देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एकत्रित शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला होता. एकत्रित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे युती तुटली होती. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. परंतु १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. तसे शिंदे यांना स्पष्टपणे सांगून टाकण्यात आले आहे.
भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. परंतु आपल्याला अजून एक वर्ष मुख्यमंत्री राहू द्या, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसाठी आपण मुख्यमंत्रिपदावरून बाजूला होऊ, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वाला केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुका आपल्या नेतृत्वात लढल्या गेल्या आहेत. महायुतीने विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच आपल्याला मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केले गेल्यास त्यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे हे भाजप नेतृत्वाकडे मांडत आहेत. परंतु त्यांच्या भूमिकेला भाजप नेतृत्व प्रतिसाद देत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत भाजप एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास तयार नाही. त्याऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंना एक्सचेंज ऑफर दिली आहे. नव्या सरकारमध्ये एक तर उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात या आणि तुमचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये ठेवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदेंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपने दिलेल्या या दोन प्रस्तावांवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा झाली. परंतु या प्रस्तावांवर कोणताही निर्णय झालेला नाही. राज्य पातळीवर निर्णय होत नसल्यामुळे भाजप नेतृत्वच हस्तक्षेप करून निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल चर्चा केली जाईल. कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदे द्यायची, याबाबतही या भेटीत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्रिपदाचा निर्णयही अमित शाह हेच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येते.
पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भूमिका मांडली आहे. भाजपकडे जास्त जागा असल्यामुळे ते मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत. फडणवीस चार पावले मागे आले होते, तसे शिंदे यांनी दोन पावले मागे आले पाहिजे. शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे. उपमुख्यमंत्री बनायचे नसेल तर त्यांनी केंद्रात यावे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह विचार करतील, असे रामदास आठवले यांनी नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले. शिंदेंनी नाराज होणे चांगली गोष्ट नाही. त्यांच्या ५७ आमदारांची आम्हाला गरज आहे, असेही आठवले म्हणाले.
शिंदेंना ‘तसा’ शब्दच दिला नव्हता
आपल्याला दुसऱ्यांदा संधी मिळावी, असे एकनाथ शिंदे यांना वाटते. शिवसेनेकडून बिहार पॅटर्न सूचवला जात आहे. पण त्या पॅटर्नचा विचार करण्यासारखी आताची परिस्थिती नाही. सत्ता आल्यावर तुम्हालाच मुख्यमंत्री करू, असे आश्वासन जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिले होते. पण तशा प्रकारे शिंदेंना कोणताच शब्द देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बिहार पॅटर्नचा प्रश्नच येत नाही,असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.