मुंबई: अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडीदेवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली.
राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला. राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी या मंदिराला भेट दिली होती.
साकळाई देवी व सागरमाता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवी मंदिर परिसरातच श्रीराम पंचायतन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राजभवन देवी मंदिर समितीतर्फे यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीराम पंचायतन स्थापना विधीला राज्यपाल बैस यांचे कुटुंबीय तसेच राजभवन संकुलातील निवासी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी मंदिर निर्माण कार्य करणाऱ्या श्रमिकांची भेट घेतली तसेच मंदिराची योग्य देखभाल ठेवल्याबद्दल राजभवन देवी मंदिर सदस्यांचे कौतुक केले.