औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ते जुन्या काळातील आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. शाळेत शिक्षण घेताना तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न आम्हाला शिक्षक विचारायचे. तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरी यांचे नाव सांगायचे. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत नव्या युगाचे आदर्श सापडतील, असे कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ झाला. बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी होते. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मानद डी.लिट. प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला आणि ते जुन्या काळातील आदर्श असल्याचे सांगितले.