मुंबईः आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरएसएस आणि भाजपकडून येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मात्र २२ जानेवारीला मात्र पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुटी जाहीर केली. विशेष म्हणजे एखाद्या धार्मिक समारंभासाठी केंद्र किंवा राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
’२२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण भारतात अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना समारोह साजरा केला जाईल. कर्मचाऱ्यांना या समारंभात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे की संपूर्ण भारतात सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना अर्ध्या दिवसासाठी बंद राहातील. २२ जानेवारी २०२४ रोजी सर्व कार्यालये सकाळपासून दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहातील,’ असे केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थित केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कार्यालयात अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली असली तरी गृह मंत्रालयाच्या पत्रकाचा हवाला देऊन महाराष्ट्र सरकारने मात्र २२ जानेवारीला पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने आजच जारी केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात २२ जानेवारीला शैक्षणिक संस्था अंशतः बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांची चांदी
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राम मंदिर आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेशी काहीएक घेणे देणे नसलेल्या कर्मचाऱ्यांची मात्र चांदी झाली आहे. कारण २० जानेवारीला चौथा शनिवार असल्यामुळे पाच दिवसाच्या आठवडा लागू नसलेली कार्यालये बंद रहाणार आहेत. २१ जानेवारीला रविवार म्हणजे हक्काच्या सुटीचा दिवस आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारीला पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुटी जाहीर केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस पर्यटनस्थळी जाऊन एन्जॉय करण्याची नामी संधी मिळाली आहे.