
मुंबईः महाराष्ट्र सरकारने गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारने आधी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीत या सार्वजनिक सुट्टीचा समावेश नव्हता. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी ही मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांसह निवडणुका होऊ घातलेल्या २९ महानगरपालिकांच्या क्षेत्रात लागू असेल. ही सार्वजनिक सुट्टी केवळ संबंधित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक कार्यक्षेत्रासाठीच लागू असेल, असे राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
या सार्वजनिक सुट्टीबाबतची अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून या महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या २९ महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
‘या’ महापालिका क्षेत्रात ही सुट्टी लागू
- मुंबई-एमएमआरडीए विभागः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल.
- पश्चिम महाराष्ट्रः पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी.
- उत्तर महाराष्ट्रः नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव.
- मराठवाडाः छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना.
- विदर्भः नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर.
