छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अख्खे मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) येत असून तब्बल सात वर्षांनंतर उद्या (१६ सप्टेंबर) रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होत आहे. तीन तास चालणाऱ्या या बैठकीत दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
यंदा उशिराने झालेला पाऊस दाखल झालेल्या मान्सूनने ऑगस्टमध्ये चांगलीच दडी मारली. मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट घोंगावत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल आणि दुपारी २ वाजता ती संपेल. या बैठकीत दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी भरीव घोषणांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे. मात्र घोषणा झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी किती तत्परतेने केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महायुती सरकारच्या काळात सात वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तो कालबद्ध कार्यक्रम आता कालबाह्य झाला तरी मराठवाड्याच्या विकासाचे रूतलेले चाक काही गतीमान झालेले नाही. उद्या शनिवारी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या प्रश्नांवर केवळ तीन तास चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे तीन तासांच्या बैठकीनंतर मराठवाड्याच्या पदरी नेमके काय पडणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
बैठकीचा थाट ‘फाईव्ह स्टार’, देणार काय सरकार?
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट गडद झालेले असल्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त मराठवाड्यात बैठकीसाठी येत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा थाट मात्र ‘फाईव्ह स्टार’ राहणार आहे.
आजवर छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सहकाऱ्यांचा मुक्काम सुभेदारी शासकीय विश्रामगृहातच असायचा. मात्र या बैठकीसाठी येत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसाला ३२ हजार रुपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलच्या खोलीत थांबणार आहेत.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना थांबण्यासाठी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये ३० रुम बुक करण्यात आल्या आहेत. हॉटेल ताजमध्ये बुक करण्यात आलेल्या ४० रुम्समध्ये सर्व सचिव थांबणार आहेत.
हॉटेल अजंता ऍम्बेसिडरमध्ये ४० रुम बुक करण्यात आल्या आहेत. येथे उपसचिव आणि खासगी सचिव थांबणार आहेत. अमरप्रित हॉटेलमधील ७० रुममध्ये उपसचिव, खासगी सचिव आणि कक्ष अधिकारी वास्तव्य करणार आहेत.
भोजनाच्या व्यवस्थेचे कंत्राट नम्रता केटरर्सला देण्यात आले असून जेवणाच्या थाळीचा दर एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. तीन तासांच्या बैठकीसाठी होत असलेला हा पंचतारांकित थाट मराठवाड्याचे नेमके कोणते प्रश्न मार्गी लावून जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शनिवारी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद
शनिवारी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर आमखास मैदानाजवळील जामा मशिदीसमोरील चौक ते दिल्ली गेटपर्यंतचा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. दिल्ली गेटपासून आमखास मैदानाकडे जाणारा रस्ताही बंद राहील. पंचायत समिती ते अण्णाभाऊ साठे चौक ते आमखास मैदानाकडे जाणारा रस्ताही बंद ठेवण्यात येणार आहे.