मुंबईः राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ११ किंवा १२ डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. या दोन दिवशीय अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
मंत्री, खातेवाटप याबाबत निर्णय न झाल्यामुळे गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीच शपथ घेतली. मात्र आठवडाभरात हे तीनही नेते एकत्र बसून मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
नव्या महायुती सरकारमध्ये भाजपकडे २० मंत्रिपदे राहणार आहेत. पण त्यापैकी काही मंत्रिपदे रिक्त ठेवली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असा भाजपचा विचार आहे.
या सरकारमध्ये शिवसेनेला ११ किंवा १२ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढीच मंत्रिपदे हवी आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती द्यावी आणि त्यांच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचेही सांगण्यात येते. भाजपने अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड या शिवसेनेच्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याला आक्षेप घेतलेला आहे.
मराठवाड्यातून कोणाला संधी?
मंत्रिमंडळात संधी देताना विविध समाजाना स्थान, विभागीय संतुलन या बाबींचाही विचार करावा लागतो. एखाद्या मंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी त्या त्या भागात तीन तीन पक्षांच्या आमदारांना संधी देताना वेगळा निर्णय घ्यावा लागू शकतो, असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबतचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. मराठवाड्यातील संभाव्य नावे अशीः
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातून भाजपकडून अतुल सावे आणि प्रशांत बंब तर शिवसेनेकडून संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार ही नावे चर्चेत आहेत. परंतु शिवसेनेकडून शिरसाट यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यातून शिवसेनेकडून अर्जुन खोतकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. भाजपकडून बबनराव लोणीकर, संतोष दानवे आणि नारायण कुचे हे इच्छूक आहेत. भाजपकडून या तिघांपैकी एकालाच संधी दिली जाण्याची शक्यता असून त्यात संतोष दानवे प्रबळ मानले जात आहेत.
परभणी जिल्ह्याला मागील दहा वर्षांपासून मंत्रिपद मिळालेले नाही. यावेळी जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर या मंत्रिपदासाठीच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी भाजपला पाठिंबा दिलेला असला आणि ते मंत्रिपदासाठी इच्छूक असले तरी निवडणूक निकालानंतर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यातून भाजपचे तानाजी मुटकुळे हेही मंत्रिपदाची अपेक्षा धरून बसलेले आहेत. बोर्डीकरांपेक्षा त्यांची दावेदारी प्रबळ असल्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यातून भाजपकडून मुखेडचे आमदार तुषार राठोड आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांची नावे चर्चेत आहेत. नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या मोठी आहे. परंतु आजपर्यंत जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आदिवासी चेहरा द्यायचा झाल्यास भीमराव केराम हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
भोकरमधून माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या पहिल्यांदाच विधानसभेवर गेल्या आहेत. परंतु त्यांची पहिलीच टर्म असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे. विधान परिषद सदस्य हेमंत पाटील हे शिवसेनेकडून इच्छूक असले तरी विधान परिषद सदस्याला संधी द्यायची नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातून भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिमन्यू पवार आणि रमेश कराड यांची नावे चर्चेत आहेत. सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिमन्यू पवार यांचा यावेळी मंत्रिपदासाठी विचार होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय बनसोडे आणि अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हेही मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मागच्या मंत्रिमंडळात बनसोडे हे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांनाच पुन्हा संधी दिली जाते की पाटलांची वर्णी लागते, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद जवळपास निश्चित मानले जात आहे. तर भाजपकडून केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या नावाचा विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे. नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या भाजपच्या धोरणात त्या बसू शकतात.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांचा यावेळी मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांना पुन्हा अपेक्षा आहे. परंतु भाजपचा त्यांचा मंत्रिमंडळ समावेशाला आक्षेप आहे.