मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) विक्रमी मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे ३० वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक ६६.०५ टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे ५ टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार अभिनंदनास पात्र ठरला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. २० नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले.
यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांनी सर्वाधिक मतदान झाले.
महाराष्ट्र राज्याच्या २८८ मतदारसंघाकरिता राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष मतदार, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार तर ६ हजार १०१ इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदार आहेत.
यात प्रत्यक्ष मतदानात ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.
२८८ मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे ८४.९६ टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात ४४.४४ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.