औरंगाबाद: सिल्लोडचे एकेकाळी काँग्रेसचे, आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. त्यांच्या कामाचा ‘झपाटा’ एवढा आहे की ते वेळकाळही पहात नाहीत. त्यामुळेच त्यांनी शनिवारी सायंकाळी अंधारून आलेले असतानाही ‘दिवे’ लावून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे ‘कृतीशील’ लोकप्रतिनीधी म्हणूनच ओळखले जातत. तशी त्यांची प्रत्येकच ‘कृती’ आगळीवेगळी असते आणि म्हणूनच ती चर्चेचा विषयही ठरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याला त्यांनी शंभर बसेस भरून लोक पाठवले होते. त्याची औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडेच भरपूर चर्चा झाली. ही चर्चा थांबते न थांबते तोच अब्दुल सत्तारांची जिची रग्गड चर्चा होईल अशी आणखी एक ‘कृती’ समोर आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात. तोच ‘खंबीर’पणा दाखवण्यासाठी कृषिमंत्री सत्तार हे रात्र अंधारून आलेली असतानाही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्या अंधारातच त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
विशेष म्हणजे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात परतीच्या पावसाने पिकांची प्रचंड नासाडी केली आहे. वैजापूर तालुक्यात तर पिकांत पाणीच पाणी झाले आहे. त्यातच बिबट्याचा वावरही वाढल्यामुळे शेतवस्ती राहणाऱ्या शेतकऱ्यांनी गावात बस्तान मांडले आहे. शेतीची कामे आटोपून हे शेतकरी सायंकाळी पाच वाजताच गावाकडे परत फिरतात. अशाही स्थितीत अंधारून आलेल्या रात्री सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. अंधारून आलेले असतानाही त्यांनी पाण्याखली गेलेल्या पिकांची पाहणी केली आणि ‘दिवे’ लावून शेतकऱ्पांशी (की कार्यकर्त्यांशी?) संवाद साधतानाचे फोटो सेशन केले. ही पाहणी करून सत्तार रात्री ८.३५ ते ८.४० वाजेच्या दरम्यान दिनेश परदेशी यांच्या घरी पोहोचले.
यावेळी आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, पं. स.माजी सभापती बाबासाहेब जगताप, गंगापूर तहसीलदार सतीश सोनी, गंगापूर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, वैजापूर तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गंगापूर गटविकास अधिकारी विजय परदेशी, वैजापूर गटविकास अधिकारी हरकळ यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आदींची उपस्थिती होती.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?: परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असे सत्तार म्हणाले.
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगाव तर वैजापूर तालुक्यातील भुगाव, लाडगाव , नांदूरढोक,कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.