लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच धैर्यशील मोहितेंचा भाजपला धक्का, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; माढ्यातील समीकरणे बदलणार


सोलापूरः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत रंगात येत असतानाच सोलापूरमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून ते शरद पवारांच्या पक्षाकडून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली. निंबाळकरांच्या उमेदवारीवरून अकलूजचे मोहिते-पाटील नाराज झाले होते. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती.

या नाराजीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरूवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीस, माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी होती.

धैर्यशील मोहिते-पाटील हे १३ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली जाईल, असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!