कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): वेतन अनुदानाची तब्बल १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपये रक्कम हडप करणाऱ्या खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्तीचे पैसेही ढापल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.  त्यामुळे अल्पसंख्यांक दर्जाच्या नावाखाली कोहिनूर शिक्षण संस्थेने अंदाधुंद कारभार चालवत गरिब विद्यार्थ्यांचीही पोटे मारून आपल्या तुंबड्या भरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे व्यवस्थापनाने महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत विद्यार्थ्यांकडून घेतलेली कोट्यवधी रुपयांची अनामत रक्कमही घशात घातली आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनापोटी प्राप्त झालेले वेतन अनुदान मनमानी पद्धतीने परत केल्यामुळे कोहिनूर शिक्षण संस्थेचे खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चर्चेत आले आहे. या चर्चेदरम्यानच आता कोहिनूर महाविद्यालयाचा भ्रष्ट‘नूर’ही समोर येऊ लागला आहे.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!

सन २००७-०८ मध्ये कोहिनूर महाविद्यालयाला शासन अनुदान मिळाले. या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. या महाविद्यालयाला मुस्लिम अल्पसंख्यांक दर्जा असला तरी या महाविद्यालयात अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्वच समाज घटकांतील विद्यार्थी प्रवेश घेतात. हे अभ्यासक्रम चालवताना अल्पसंख्याक दर्जाच्या नावाखाली महाविद्यालय व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने कारभार चालवत प्रचंड अनियमितता केल्याचे विभागीय सहसंचालक कार्यालयाने केलेल्या अनुदान निर्धारणात उघडकीस आले आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे म्हणून या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती आधी महाविद्यालयामार्फत वाटप केली जात होती. कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमांवरही डल्ला मारला आहे.

सन २०१६-१७ मध्ये कोहिनूर महाविद्यालयात ४९५ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केले. सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाच्या खात्यावर वर्गही केली. परंतु कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची ४३ हजार ५२५ रुपये रक्कम विद्यार्थ्यांना वाटप न करता हडप करून टाकल्याची धक्कादायक बाब अनुदान निर्धारणात उघडकीस आली आहे.

हेही वाचाः PET-2024 मध्ये गुणवाढ घोटाळा?, ‘ग्रिव्हन्स’मध्ये समाजकार्य विषयात ६३ हून अधिक परीक्षार्थ्यांचे वाढले ८ ते २४ गुण; नापासही झाले पास!

कोहिनूर शिक्षण संस्थेच्या विनंतीवरून विभागीय सहसंचालक कार्यालयाने या महाविद्यालयाचे सन २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीचे अनुदान निर्धारणाचे काम सुरू केले. सन २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत महाविद्यालयात नेमका किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला?  त्यापैकी शिष्यवृत्ती योजनानिहाय विद्यार्थी किती होते?  या विद्यार्थ्यांना नेमकी किती शिष्यवृत्ती मंजूर झाली?  मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीपैकी विद्यार्थी व संस्था यांना किती रक्कम प्राप्त झाली? त्यापैकी किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची झाडाझडती विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या अनुदान निर्धारण पथकाने घेतली. त्यावेळी हा घोटाळा उघडकीस आला आहे.

हेही वाचाः सहायक प्राध्यापकपदासाठी ‘नेट/सेट’ अद्यापही अनिवार्यच, यूजीसीच्या अध्यक्षांनी चार नियम सांगत दूर केला गोंधळ!

कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सन २०१६-१७ या एकाच शैक्षणिक वर्षात ४३ हजार ५२५ रुपये शिष्यवृत्तीची रक्कम हडप करून टाकली. त्यामुळे २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून कोहिनूर महाविद्यालयाने नेमकी किती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची किती रक्कम हडप केली, याची स्वतंत्र चौकशी केल्यास मोठा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष सहायत्ता विभाग या घोटाळ्याची झाडाझडती घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या अनामत रक्कमांवरही डल्ला

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय व अन्य बाबींसाठी अनामत रक्कम घेतली जाते. प्रवेशित विद्यार्थी महाविद्यालय सोडून जाताना ही अनामत रक्कम त्याला परत करणे अनिवार्य आहे. या अनामत रकमेचा स्वतंत्र हिशेब ठेवणेही अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना बंधनकारक आहे. परंतु कोहिनूर महाविद्यालयाने स्थापनेपासून विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम तर स्वीकारल्या परंतु महाविद्यालय सोडून जाताना ही रक्कम विद्यार्थ्यांना परतच केली नाही.

सन २००७-०८ पासून महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांकडून किती अनामत रक्कम स्वीकारण्यात आली? किती विद्यार्थ्यांना किती अनामत रक्कम परत करण्यात आली?  आणि सध्या महाविद्यालयाकडे नेमकी किती रक्कम शिल्लक आहे? याचा कुठलाही ताळेबंद महाविद्यालय व्यवस्थापनाकडे उपलब्ध नाही. ही रक्कम कोटींच्या घरात जाते. विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम जणू हडप करण्यासाठीच आहे, अशा अविर्भावात महाविद्यालय व्यवस्थापनाने या रकमेवर डल्ला मारल्याचे अनुदान निर्धारणातून उघड झाले आहे. आता उच्च शिक्षण संचालनालय या महाविद्यालय व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करणार की महाविद्यालय व्यवस्थापनाला मोकळे रान सोडणार? हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!