अमित शाहांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानः काँग्रेस, बसपची २४ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा


नवी दिल्लीः राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने २४ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. दुसरीकडे बहुजन समाज पार्टीनेही याच दिवशी देशव्यापी निषेध आंदोलनाची घोषणा केली आहे.

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे सर्व खासदार आणि केंद्रीय कार्य समितीचे सदस्य रविवार (२२ डिसेंबर) आणि  सोमवारी (२३ डिसेंबर) पत्रकार परिषदा घेतील. २४ डिसेंबर रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मार्च काढण्यात येईल, असे परिपत्रक पक्षाचे सरचिटणीस (संघठन) के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना पाठवले आहे.

काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणारा सन्मान मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निघेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून निवेदन देईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालये आणि शहरांमध्ये आयोजित पत्रकार परिषदांना काँग्रेसचे खासदार आणि सीडब्ल्यूसीचे सदस्य पत्रकारांना संबोधित करतील.

गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव घेणे आता ‘फॅशन’ बनली आहे, असे वक्तव्य राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केले होते. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निषेध आंदोलने केली आहेत. आता हा मुद्दा देशव्यापी करण्यासाठी काँग्रेसने २४ डिसेंबर रोजी देशातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मार्च काढण्याची घोषणा केली आहे.

बसपाचेही देशव्यापी आंदोलन

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बसपाचे कार्यकर्ते २४ डिसेंबर रोजी देशभरात निषेध आंदोलन करतील, अशी घोषणा बसपा प्रमुख मायावती यांनीही शनिवारी केली आहे. शाह यांच्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. देशातील दलित, वंचित व अन्य उपेक्षित लोकांचा स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठी अतिमानवीय व कल्याणकारी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवाइतकेच पूज्यनीय आहेत. अमित शाह यांनी त्यांचा अपमान केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे ट्विट मायावती यांनी केले आहे.

अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यामुळे देशातील सर्व समाज घटकांतील लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. आंबेडकरवादी बीएसपीने अमित शाह यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेऊन पश्चाताप करण्याची मागणी केली आहे. ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे २४ डिसेंबर रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन केले जाईल, असे मायावती यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!