पुणेः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकून एका व्यक्तीने त्यांचे तोंड काळे केले. आज पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा देत ही शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठाच्या कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याच्या सर्वस्तरातून निषेध केला जात असून आज पुण्यासह विविध ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली आहेत.
औरंगाबाद दौरा आटोपून चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात दाखल झाले. पिंपरी चिंचवड येथील नियोजित कार्यक्रमाला ते हजेरी लावणार होते. त्यापूर्वी ते पिंपरी चिंचवड येथील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहापान करून ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्या तोंडावर अज्ञात व्यक्तीने थेट शाईफेक केली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा तोल गेला आणि ते पडता पडता थोडक्यात सावरले.
शाईफेक करणारी व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचा विजय असो, अशा घोषणा देत होती. पोलिसांनी लगेच त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमाला येणार असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांची नजर चुकवून ही शाईफेक करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमस्थळाजवळच आंदोलन केले आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध केला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.