इंडिया आघाडी किमान २९५ जागा जिंकणारः एक्झिट पोलच्या अंदाजापूर्वीच काँग्रेस अध्यक्षांचा मोठा दावा


नवी दिल्लीः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला किती जागा मिळतील? याबाबत राजकीय विश्लेषकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत असले तरी या निवडणुकीत इंडिया आघाडी कमीत कमी २९५ जागा जिंकणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

मीडिया आणि राजकीय विश्लेषक एक्झिट पोलवर चर्चा करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्ही लोकांना वास्तव सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. इंडिया आघाडी कमीत कमी २९५ जागा जिंकणार आहे. हा जनतेचा सर्वे आहे. आमच्या नेत्यांनी केलेल्या सर्वेनुसार आम्ही हा आकडा सांगत आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज संपले. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक शनिवारी खरगे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झाली. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खा. संजय सिंह आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

 बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही लोकांनी आपसात जो फिडबॅक शेअर केला आहे, त्यानुसार इंडिया आघाडीला कमीत कमी २९५ जागा मिळतील. प्रत्येक ठिकाणचा फिडबॅक घेतल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की इंडिया आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल. भाजपला जवळपास २२० जागा मिळतील तर एनडीएला २३५ जागा मिळतील. इंडिया आघाडी पुढे वाटचाल करत आहे आणि एक भक्कम सरकार स्थापण्याच्या तयारीत आहे.

 उत्तर प्रदेश भाजप सर्व जागांवर पराभूत होईल आणि इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा जिंकेल. बेरोजगारी, महागाई आणि जीएसटीचा भूकंप आला आहे. सीबीआय, ईडी आणि इन्कमटॅक्स हे सर्व भूकंप आता संपून जातील, असे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव म्हणाले.

एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार

एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार नाही, असे आधीच काँग्रेसने जाहीर केले होते. परंतु आज शनिवारी सायंकाळी झालेल्या चर्चेअंती इंडिया आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी टीव्ही चॅनेलवरील एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय सर्वसम्मतीने घेतला. एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होण्याच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या मतांवर विचार करून सर्व घटक पक्षांनी एक्झिट पोलच्या चर्चेत  सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *