मुंबई: परभणी येथील भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, यासंदर्भात सत्य परिस्थिती तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिनाभरात सखोल चौकशी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
परभणी येथील पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबाबत सदस्य अब्दुल्ला खान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवर खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीबाबत सखोल चौकशी एका महिन्याच्या आत करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.