मुंबईः तब्बल पंधरा दिवस उशिराने दाखल झालेल्या पावसाने राज्यातील काही भागांचा अपवाद वगळता बहुतांश भागात दमदार हजेरी लावली असून जून महिन्याचा शेवटचा दिवस आणि जुलै महिन्याचे पहिले तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून उशिराने आल्याची कसर भरून काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येत्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. पुणे येथील हवामान खात्याच्या वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून २ जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत आणि संलग्न भागांवर राहील, असे ट्विट होसाळीकर यांनी केले आहे. त्यामुळे जुलै महिन्याचे पहिले तीन दिवस राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पावसाचे तर दोन दिवस मुसळधार पावसाचे असण्याची दाट शक्यता आहे.
३० जूनः हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज (३० जून) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे जिल्ह्यांत अतिसमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
१ जुलैः पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, संधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
२ जुलैः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
३ जुलैः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पालघर, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
४ जुलैः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
४ जुलैला उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात ३० जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. १ ते ४ जुलै दरम्यान मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात ३० जून ते ६ जुलैदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी आणि दिनांक ७ ते १३ जुलैदरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ५ जुलै ते ११ जुलेदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूचा पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मीमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत सर्व खरीप पिकांची( मुग, उदीड, भुईमूग सोडून) पेरणी करता येते, असे ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने म्हटले आहे.