मुंबईः औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर या नामांतरावरून निर्माण झालेला वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार,’ अशी भूमिका जाहीर करत या नामांतराला टोकाचा विरोध जाहीर केला आहे.
एमआयएमच्या राष्ट्रीय परिषदेची दोन दिवसीय बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. बैठकीत बोलताना एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध जाहीर केला.
इम्तियाज जलील ह औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर काही जण उड्या मारत आहेत आणि नाचत आहेत. परंतु माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी फक्त औरंगाबादमध्येच मरणार, असे खा. जलील म्हणाले.
खा. ओवैसी यांचाही विरोधः याच बैठकीत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही औरंगाबादच्या नामांतराला विरोध कायम राहील, असे जाहीर केले आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच हे नामांतर परस्पर करण्यात आले आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? नाव बदलल्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांना दोनवेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का? असे सवाल खा. ओवैसी यांनी केले आहेत.