परभणीः इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत असतानाच परभणी जिल्ह्यात सहा शिक्षकांनीच बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉप्या तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सहा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी परीक्षेच्या आधी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली होती. कॉपीमुक्तीसाठी शिक्षकांच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या होत्या.
एवढे करूनही ज्यांच्यावर कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्याच शिक्षकांनी कॉपीयुक्त परीक्षेचे अभियान हाती घेतल्याचे इंग्रजीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी स्पष्ट झाले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राबवण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इंग्रजीचा पेपर परीक्षार्थ्यांना आकरा वाजता देण्यात आला. हा पेपर दिल्यानंतर काही शिक्षकांनी तो व्हॉट्सअपवर इतर शिक्षकांना पाठवला. पेपर मिळाल्यानंतर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कॉप्या तयार केल्या.
खबऱ्यामार्फत ही माहिती मिळताच पोलिसांनी कॉप्या तयार करत असलेल्या या शिक्षकांवर धाड टाकली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता या चौकशीतून ते व्हॉट्सअपवर इंग्रजीचा पेपर मिळवून विद्यार्थ्यांसाठी कॉप्या तयार करत असल्याचे स्पष्ट झाले.
या कॉपीप्रकरणात एकदोन नव्हे तर तब्बल सहा शिक्षकांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या शिक्षकांविरुद्ध महाराष्र विद्यापीछ, शिक्षण मंडळ व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ च्या कलम ५,७ व ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले या शिक्षकांचा समावेश आहे. पोलिसांनी या सहा शिक्षकांना अटक केली आहे.