मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या एका महिला कार्यकर्तीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतरा महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिलेचा नेमका विनयभंग कसा झाला? तेच कळत नाही, असे खा. सुळे म्हणाल्या.
मी तो व्हिडीओ पाहिला. एकदा नाही तर चार ते पाचवेळा पाहिला. कारण मीही एक महिला आहे. एक महिला जेव्हा तक्रार करते तेव्हा मी अगदी तटस्थपणे त्या महिलेच्या तक्रारीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच घडली. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ हे घडल्याचे दिसत आहे. तेथे प्रचंड गर्दी होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रचंड पोलीस यंत्रणा असते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा, उत्साही कार्यकर्ते, सहकारी कार्यक्रमाला आले होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचाः जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच केली घोषणा
जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केले. तसेच त्यांनी समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केले. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाले हे कळत नाही. हे गैरसमजातून आणि चुकीच्या संवादातून झाले आहे, असे मला वाटते. असे असले तरी त्या महिलेची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे. मात्र लगेचच पोलीस स्टेशनला जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलणे किती योग्य? याचा सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा, असेही खा. सुळे म्हणाल्या.
राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. हे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही तर राजकीय क्षेत्रातील सर्व लोक म्हणून याकडे माणुसकीच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे आवाहनही खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. माझी जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचे उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्रास होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, असेही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जितेंद्र आव्हाडांना मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने निवडून दिले आहे. ते मुंब्रामध्ये अतिशय चांगले काम करत आहेत. मंत्री असो किंवा नसो मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहनही खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.