नांदेडः देशभरात गुरूवारी प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज नांदेड जिल्ह्यातील ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडजवळील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहीपाल येथील कुटुंबीयानीच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या २३ वर्षीय मुलीचा निष्ठूरपणे खून करून तिचा मृतदेह परस्पर जाळला आणि राख ओढ्यात विसर्जित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कुटुंबीयांच्या ऑनर किलिंगला बळी पडलेल्या मुलीचे नाव शुभांगी जोगदंड आहे. २३ वर्षीय शुभांगी नांदेडमधील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातीलच तरूणासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध होते. परंतु तिच्या कुटुंबीयांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते.
शुभांगीच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी शुभांगीसाठी दुसरे स्थळ पाहिले. तिची सोयरिकही झाली होती. परंतु आठच दिवसात ही सोयरिक मोडली. सोयरिक मोडल्यामुळे गावात आपली बदनामी झाली, असे वाटून शुभांगीच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरातच शुभांगीच्या कुटुंबीयांनी गेल्या रविवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी तिचा खून केला आणि मृतदेह शेतात जाळून टाकला. मृतदेह जाळल्यानंतर राख शेजारच्या ओढ्यात टाकून दिली.
असा झाला खूनाचा उलगडाः तीन दिवासांपासून शुभांगी बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा सुरू झाली. शुभांगी हरवली की तिचे काही बरेवाईट झाले? म्हणून तिची शोधाशोध सुरू झाली. गुप्त बातमीदाराने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांना तिच्या कुटुंबीयांवर संशय आला. त्या दिशेने तपास केला असता सोयरिक मोडल्यामुळे गावात बदनामी झाल्याने रागाच्या भरात आम्हीच शुभांगीची हत्या केली, अशी कबुली तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलिसांनी शुभांगीचे वडील, भाऊ, मामा आणि काकाची दोन मुले अशा पाच जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे सबंध महाराष्ट्र हादरून गेला आहे.