‘त्याची ऑर्डर आजच काढा, मी सांगेल तेच करायचे; मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही,’ आरोग्यमंत्री सावंतांची पोलिस अधीक्षकांना दमबाजी!


धाराशिव (उस्मानाबाद): ‘मी सांगितले तसेच झाले पाहिजे…करायचे म्हणजे करायचे…चर्चा-बिर्चा काही नाही… त्यांची ऑर्डर आजच काढा… आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो…’ अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एका निलंबित पोलिस निरीक्षकाला गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी करत धारेवर धरले. ही सध्या ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यातच आता त्यांच्या या व्हायरल व्हिडीओ क्लिपची भर पडली आहे. आंबेजोगाई कार्यरत येथे अवैध धंद्यांना अभय, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कुचकामी ठरलेले पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यावर ऑगस्ट २०२२ मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

आंबेजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत असताना वासुदेव मोरे यांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

आता त्याच वासुदेव मोरे यांनी धाराशिवच्या गुन्हे शाखेत नियुक्ती मिळवण्यासाठी थेट पालकमंत्र्यांकडूनच पोलिस अधीक्षकांवर दबाव आणल्याची चर्चा आहे. धाराशिवच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.

या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी वासुदेव मोरे यांनी चांगलाच जोर लावला. त्यासाठी त्यांनी थेट आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यापर्यंत फिल्डिंग लावली. त्यानंतर  आरोग्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या घोळक्यातच धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दमबाजी करत धारेवर धरले.

‘धाराशिवच्या रिक्त झालेल्या गुन्हे शाखेच्या जागी पोलिस निरीक्षक म्हणून वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा… त्यांची ऑर्डर आजच काढा…चर्चा-बिर्चा काही नाही… मी सांगेल तेच करायचे… करायचे म्हणजे करायचे…आपण मुख्यमंत्र्यांचे सुद्धा ऐकत नसतो…’ अशी दमबाजी तानाजी सावंत यांनी सार्वजनिक ठिकाणीच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना केल्याचे या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे.

तानाजी सावंत यांच्या सांगण्यावर पोलिस अधीक्षक कुलकर्णी हे आपण चर्चा करू असे म्हणतात, पण चर्चा-बिर्चा काही नाही, नो कॉम्परमाइज, करायचे म्हणजे करायचे, असे सावंत म्हणताना दिसत आहे.

‘नो कॉम्परमाईज…नो डिस्कस…त्याला आजच ऑर्डर काढा…मी सांगितले ते करायचे… मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही तर तुम्ही ते… तुम्हाला सांगितल्यावर… करायचे म्हणजे करायचे.. हं पुन्हा उचलून फेकू काही राडा घातला तर…आपणच करणार आहोत…’ असे कार्यकर्त्यांच्या घोळक्यात सार्वजनिक ठिकाणी असलेले तानाजी सावंत या व्हायरल व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट होत नाही. मात्र याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर वासुदेव मोरे यांच्यावर धाराशिवच्या गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिवचे (उस्मानाबाद) पोलिस अधीक्षक हे आरोग्यमंत्री तानाजीची सावंत यांच्या दबावाखाली काम करत आहेत की काय? अशी चर्चाही आता जिल्ह्यात होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *