नवी दिल्लीः हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर दशकभरानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू विधानसभेची शक्यता असली तरी मतदारांनी दिलेल्या कौलानुसार काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचे पारडे जड दिसत आहे. हरियाणातही भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता असून १० वर्षांनंतर काँग्रेसची पुन्हा बहुमताने सत्ता येईल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी आज (५ ऑक्टोबर) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधीच आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार हरियाणात तब्बल १० वर्षानंतर काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ५१ ते ६१ जागा तर भाजपला २७ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने हरियाणाची सत्ता हाती घेतली होती.
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर तब्बल दशकभरानंतर तेथे विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले. हरियाणाबरोबरच जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा निकालही ८ ऑक्टोबर रोजीच जाहीर होणार असून एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला कौल दिल्याचे दिसत आहे.
हरियाणात कोणत्या पक्षाला किती जागा?
पक्ष | न्यूज २४- चाण्यक | रिपब्लिक टीव्ही-पी मार्क | टाइम्स नाऊ | इंडिया टुडे-सीव्होटर्स |
भाजप (एनडीए) | १८ ते २४ | १८ ते २४ | २२ ते ३२ | २० ते २८ |
काँग्रेस (इंडिया आघाडी) | ५५ ते ६२ | ५५ ते ६२ | ५० ते ६४ | ५० ते ५८ |
इतर | २ ते ५ | २ ते ५ | २ ते ८ | १० ते १४ |
जम्मू-काश्मीरच्या जनतेचा कौल कोणाला?
पक्ष | न्यूज २४- चाण्यक | रिपब्लिक टीव्ही-पी मार्क | टाइम्स नाऊ | इंडिया टुडे-सीव्होटर्स |
भाजप | २३ ते २७ | २८ ते ३० | २८ ते ३९ | २७ ते ३२ |
काँग्रेस- नॅकॉ आघाडी | ४६ ते ५० | ३१ ते ३६ | ३१ ते ३६ | ४० ते ४८ |
पीडीपी | ७ ते ११ | ५ ते ७ | ५ ते ७ | ६ ते १२ |
इतर | ४ ते ६ | ८ ते १६ | ८ ते १६ | ६ ते ११ |
जम्मू-काश्मिरात ‘इंडिया’ची शक्यता
या निवडणुकीत हरियाणात सर्वात खराब कामगिरी आम आदमी पार्टीची राहण्याची शक्यता एक्झिट पोल्सने वर्तवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये एक्झिट पोल्सचा अंदाज पाहता त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. परंतु त्यात इंडिया आघाडीचे पारडे जड दिसत आहे. जर पीडीपीने इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला किंवा सरकारमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. परंतु ही फक्त शक्यता आहे. ८ ऑक्टोबरलाच खरे चित्र स्पष्ट होईल. महेबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी अर्थात पीडीपीने भाजपशी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. पीडीपी फक्त ‘धर्मनिरपेक्ष आघाडी’चीच चर्चा करू लागली आहे. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेच्या अवस्थेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचीच रणनीती आखली जाऊ शकते.