मुंबईः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती आज जाहीर केली. अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मिलिंद बारहाते तर पुण्यातील सीईओपीच्या कुलगुरूपदी डॉ. सुनिल भिरूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेले डॉ. विजय जनार्दन फुलारी हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राचे माजी विभागप्रमुख होते. सध्या ते याच विद्यापीठात वरीष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरच्या सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुनिल गंगाधर भिरूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भिरूड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक आहेत.
सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत-यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत करण्यात आली आहे, असे राजभवनाकडून कळवण्यात आले आहे.