नवी दिल्लीः आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. म्हणजेच आज १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ एप्रिलपासून कोणते नियम बदलणार आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा थेट परिणाम होणार? हे पाहू या…
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे तेल वितरण कंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आजपासून व्यावसायिक वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
तुमचा फास्टॅग सुरू आहे का?
आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून फास्टॅगच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या तारखेपर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर आजपासून तुमचा फास्टॅग काम करणे बंद करेल.
नवीन कर व्यवस्था
१ एप्रिल २०२४ पासून नवीन करप्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली म्हणून लागू केली जाणार आहे. म्हणजेच प्राप्तिकर रिटर्न (आयटी रिटर्न) भरताना जुनी करव्यवस्था निवडली नाही तर, १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली आपोआप निवडली जाईल.
रेल्वेत सर्व सुविधा ऑनलाइन
१ एप्रिलपासून भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन नियम लागू करत आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून रेल्वे कँटिन, तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंतच्या सर्व सुविधा ऑनलाइन पेमेंटवर होणार आहेत. विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे आता क्यूआर कोड स्कॅन करून दंड वसूल करणार आहे.
आपोआप ट्रान्सफर होईल जुना पीएफ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) १ एप्रिलपासून नवीन नियम लागू केला जाणार आहे. नव्या नियमानुसार ईपीएफ खातेदाराने नोकरी बदलताच पीएफची जुनी शिल्लक रक्कम नवीन खात्यात आपोआप ट्रान्सफर होईल. म्हणजेच नोकरी बदलल्यानंतर आता तुम्हाला तुमचा जुना पीएफ बॅलेन्स नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज नाही. हा पीएफ ऑटोमॅटिक म्हणजेच स्वयंचलित तुमच्या नवीन खात्यात ट्रान्सफर होईल.
एनपीएसचे नियम बदलले
पीएफआरडीए म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून आज १ एप्रिलपासून नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये आधारआधारित लॉगइन ऑथेंटिकेशन सुरू होत आहे.
एसबीआय डेबिट कार्डचे शुल्क वाढले
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका देत आहे. एसबीआयने डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क म्हणजेच मेन्टेनन्स चार्जेस वाढवले आहेत. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होतील. कार्डच्या प्रकारानुसार एसबीआयने मेन्टेनन्स शुल्क बदलले आहेत.
एसबीआय क्रेडिट कार्डसाठी नवीन नियम
एसबीआयच्या क्रेडिट कार्डचेही नियम बदलले आहेत. आता एसबीआयच्या सर्व क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. हा बदल काही कार्डवर १ एप्रिल २०२४ पासून तर काही क्रेडिट कार्डवर १५ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.